महत्वाच्या बातम्या

 चामोर्शीत प्रसूतीसाठी दाखल महिलेचा बाळासह मृत्यू : उपचारातील कथित दिरंगाईने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न


- डॉक्टरांच्या अनुपस्थितीचा नातेवाइकांचा आरोप; रुग्णालय बदलण्याच्या धावपळीनंतर बाळाचा मृत्यू, आठ तासांनी मातेनेही सोडला जीव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पहिल्या बाळाच्या जन्माची स्वप्ने घेऊन प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या २७ वर्षीय महिलेचा नवजात बाळासह मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चामोर्शी येथे २३ ऑगस्ट रोजी घडली. प्रसूतीकळा सुरू असतानाही वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले, असा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला, तर सुमारे आठ तासांनंतर मातेनेही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे चामोर्शीच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मृत महिलेचे नाव जिजा हंसराज सातर २७, रा. जामगिरी, ता. चामोर्शी असे आहे. पहिल्या प्रसूतीसाठी त्यांना २३ ऑगस्ट रोजी पहाटे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रसूतीकळा सुरू, मात्र डॉक्टरांची प्रतीक्षा -
नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, जिजा यांना प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतरही सकाळी साडेदहा वाजेपर्यंत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते. उपस्थित परिचारिकांकडे प्रकृतीबाबत विचारणा केली असता, तब्येत चांगली आहे, असे सांगण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दोन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती असतानाही घटनेच्या वेळी एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रसूतीसारख्या अत्यंत संवेदनशील परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचारात विलंब झाला का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर रुग्णालय बदलले -
सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिजा यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय बदलण्याच्या या धावपळीत उपचारासाठी महत्त्वाचा वेळ गेला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

अखेर पावणेबारा वाजण्याच्या सुमारास जिजा यांची प्रसूती झाली. मात्र, जन्मानंतर काही मिनिटांतच नवजात बाळाचा मृत्यू झाला. पहिल्या अपत्याच्या जन्माची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सातर कुटुंबावर या घटनेने मोठा आघात झाला.

रक्तस्राव सुरू झाल्यानंतर प्रकृती आणखी गंभीर -
बाळाच्या मृत्यूचा धक्का कुटुंबीयांना पचवत असतानाच जिजा यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांना रक्तस्राव सुरू झाला, तसेच रक्तदाब वाढल्याचे सांगण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री साडेनऊ वाजता जिजा सातर यांनीही अखेरचा श्वास घेतला. काही तासांपूर्वी आई होण्याच्या आशेने रुग्णालयात दाखल झालेली महिला आणि तिच्या पोटी जन्माला आलेले बाळ दोघेही मृत्युमुखी पडल्याने सातर कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गरिबांच्या जीवाची किंमत नाही का? -
या घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे. माजी पंचायत समिती सदस्या अमिता मडावी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत वेळेवर उपचार न मिळाल्याने हा प्रकार घडला का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सिझेरियनची गरज असताना वेळेत निर्णय का घेण्यात आला नाही? डॉक्टर वेळेवर का उपलब्ध नव्हते? रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का हलवावे लागले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

ही केवळ प्रसूतीतील गुंतागुंत होती की उपचारातील दिरंगाई किंवा प्रशासकीय निष्काळजीपणामुळे परिस्थिती गंभीर झाली, हे चौकशीत स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किलनाके दाम्पत्यावर निष्काळजीपणाचे आरोप -
या प्रकरणात चामोर्शीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण किलनाके आणि महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्यावर निष्काळजीपणाचे आरोप करण्यात आले आहेत.

अमिता मडावी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच घटनेशी संबंधित डॉक्टर आणि परिचारिकांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप -
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. जिजा यांचे पती हंसराज सातर यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्नी आणि बाळाला गमावलेल्या पतीसमोर कथितरीत्या असंवेदनशील वक्तव्य करण्यात आल्याने कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. या आरोपांचीही स्वतंत्रपणे चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

चौकशीनंतर दोष निश्चित होणार -
या घटनेबाबत प्रशासनाकडून प्रतिक्रिया देताना, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात निष्काळजी झाली किंवा नाही हे चौकशीतून समोर येईल. दोषींवर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आता चौकशीत उपचारातील कथित दिरंगाई, डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णालय बदलण्याची प्रक्रिया आणि नातेवाइकांनी केलेले अन्य आरोप याबाबत नेमकी काय वस्तुस्थिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेने ग्रामीण भागातील प्रसूती सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याची व्यवस्था याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आई आणि नवजात बाळाचा गेलेला जीव लक्षात घेता, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोष निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.





  Print






Related Photos