श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षकांची भूमिका स्वीकारून विविध विषयांचे अध्यापन केले. विद्यार्थ्यांना शिक्षकांची भूमिका, जबाबदारी आणि अध्यापनातील बारकावे प्रत्यक्ष अनुभवता यावेत, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. के. सिंग होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अपर्णा मारगोनवार, डॉ. सोनाली ढवस आणि प्रा. सचिन मुरकुटे उपस्थित होते.
स्वयंशासन दिनात विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमध्ये शिक्षकांची भूमिका पार पाडली. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषय शिकविण्यासोबतच वर्गातील शिस्त, वेळेचे नियोजन, प्रश्नांना उत्तरे देणे आणि विद्यार्थ्यांशी प्रभावी संवाद साधण्याचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य तसेच जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत झाली.
उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव -
उपक्रमादरम्यान उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये बी.एस्सी. अंतिम वर्षाचा विद्यार्थी नयन सदन याने प्रथम क्रमांक, तर विक्रम सिकदर याने द्वितीय क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. के. सिंग यांनी शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमासाठी डॉ. अपर्णा मारगोनवार आणि प्रा. सचिन मुरकुटे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. महेश सिलमवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम सिकदर यांनी केले, तर स्मित गोहणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एम. पी. सिंग, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. दीपक नागापुरे, प्रा. सुबोध साखरे, प्रा. जया रोकडे, प्रा. कविंद्र साखरे, प्रा. राहुल आवारी, प्रा. रवींद्र भुरसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी रविंद्र झाडे, सविता गारगाटे, अविनाश जिवतोडे, विजय खोब्रागडे, शुभांगी डोंगरे, रमेश वागदरकर, उषाई माहूरपवार, पौर्णिमा गोहणे आणि नितु शेंडे आदींनी सहकार्य केले.




Petrol Price




