गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ०४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी, ०५ सप्टेंबर २०२६ रोजी गोपाळकाला दहीहंडी उत्सव व १० सप्टेंबर २०२६ रोजी पोळा, ११ सप्टेंबर २०२६ रोजी तान्हा पोळा आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी पासुन जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ०३ सप्टेंबर २०२६ ते ००.०१ वा. ते १७ सप्टेंबर २०२६ चे २४.०० वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१)(३) लागू करण्यात आले आहे.
त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे. कोणतीही व्यक्ती ०३ सप्टेंबर २०२६ ते ००.०१ वा. ते १७ सप्टेंबर २०२६ चे २४.०० वाजे पर्यंत पुढील कृत्य करणार नाही.
शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल, अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे यावर प्रतिबंध आहे.
उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही मिरवणूक काढू नये. पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर ०३ सप्टेंबर २०२६ ते ००.०१ वा. ते १७ सप्टेंबर २०२६ चे २४.०० वाजे पर्यंत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश ०३ सप्टेंबर २०२६ ते ००.०१ वा. ते १७ सप्टेंबर २०२६ चे २४.०० वाजे पर्यंत संपुर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील, असे जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेशित केले आहे.




Petrol Price




