महाउपलब्धी ॲपमुळे निवृत्तीवेतन सेवा होणार अधिक सुलभ


- निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी कार्यशाळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा येथे निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी महाउपलब्धी ॲपविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन २० ऑगस्ट रोजी करण्यात आले. जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली.कार्यशाळेला मिलमिले, अपर कोषागार अधिकारी, नितीन दानव, अपर कोषागार अधिकारी, प्रशांत इंगळे, उप कोषागार अधिकारी, श्री. येमले, परिवीक्षाधीन प्रशिक्षणार्थी अधिकारी तसेच कोषागार कार्यालयातील कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी निवृत्तीवेतन संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुण्यांचे जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी ९४ वर्षीय ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच निवृत्तीवेतनासंदर्भातील विविध समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले.
नितीन दानव, अपर कोषागार अधिकारी आणि प्रशांत इंगळे, उप कोषागार अधिकारी यांनी महाउपलब्धी ॲपची कार्यपद्धती, उपयोगिता आणि उपलब्ध सुविधांबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवा व माहिती अधिक सुलभतेने उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी निवृत्तीवेतन शाखेतील आदित्य बोंद्रे, पवन खंडाते, धनराज बोरकर, अजय तिवारी, गोविंद बेलखेडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून परिश्रम घेतले.




Petrol Price




