महत्वाच्या बातम्या

 वाहनांच्या वेगाला आता बसणार लगाम 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर वाहन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच विहित वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाला लवकरच १८७ इंटरसेप्टर वाहने मिळणार आहेत.
परिवहन विभागाने वायूवेग पथकासाठी १८७ इंटरसेप्टर वाहनांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला होता.

इंटरसेप्टर वाहनांमध्ये रडार स्पीड गन, ब्रेथ ॲनालायझर, टिंट मीटर, फायर इक्सटीगशर, फर्स्ट रिस्पॉन्ड किट या बाबींचा समावेश असतो. राज्यातील रस्त्यावरील अंमलबजावणी व रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीचे काम परिणामकारक होऊन अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने स्कीम फॉर स्पेशल असिस्टंट्स टु स्टेट फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन २०२२-२३ या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यास रस्त्यावरील अंमलबजावणी व रस्ता सुरक्षाविषयक बाबींकरिता ५७ कोटी रुपयांचे विशेष बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे. त्यापैकी ३८.५० कोटी रुपये इतका निधी राज्य शासनास प्राप्त झाला आहे. या निधीतून वायुवेग पथकांसाठी १८७ नवीन इंटरसेप्टर वाहने आवश्यक त्या उपकरणांसह खरेदी करण्यात येणार आहेत.

चार आरटीओला १३ इंटरसेप्टर :
- परिवहन विभागाच्या ताफ्यात १८७ इंटरसेप्टर येणार आहेत. परिवहन विभागाकडून मुंबईतील चार आरटीओला १३ इंटरसेप्टर देण्यात येणार आहेत.
- यामध्ये ताडदेव - ४, अंधेरी -३, वडाळा -३ आणि बोरिवली ३ इंटरसेप्टरचा समावेश आहे.

याशिवाय मुंबईतील परिवहन कार्यालयासाठी २ इंटरसेप्टर असणार आहेत.

परिवहन विभागाला मिळणाऱ्या १८७ इंटरसेप्टर वाहने मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या मार्चपर्यंत १८७ इंटरसेप्टर वाहने परिवहन विभागाकडे येतील. त्याची आवश्यक ती चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ताफ्यात समावेश केला जाईल.

  Print


News - Rajy
Related Photos