महत्वाच्या बातम्या

 पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र ठरणार ताडोबा भवन


- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

- ४ हजार ४८२ चौरस मीटर जागेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे पंतप्रधान ताडोबा पर्यटनासाठी येतील, असा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवे, असा विचार मनात आला. त्यामुळेच ४ हजार ४८२ चौ. मीटर मध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचे चालते- बोलते ज्ञानकेंद्र ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर येथे ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचे भुमिपूजन करताना वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनरंक्षक कुशाग्र पाठक, जितेश मल्होत्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपअभियंता राजेश चव्हाण, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

सुरवातीला इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन झाले असे घोषित करून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा भवन ही निर्जीव इमारत नसेल. तर पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ते एक चालते- बोलते विद्यापीठच राहील. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आपण सॅल्यूट करतो, तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज सॅल्यूट करण्याची गरज आहे. देशाची सेवा सर्वतोपरी आहे, तशीच वसुंधरेची रक्षा रक्षा होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्टच असला पाहिजे. जगायचा आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो पर्यावरणातूनच मिळू शकतो. त्यामुळे ताडोबा भवन हे पर्यावरणाचा आनंद देणारे केंद्र राहील.

पुढे ते म्हणाले, ताडोबा भवन हे इको- फ्रेंडली असावे, या इमारतीमध्ये विजेचे बील येता कामा नये, त्यासाठी संपूर्ण इमारत सोलर पॅनलवर करावी. या इमारतीच्या बांधकामासाठी १८ कोटी ८ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, मात्र इतर अत्याधुनिक सोयीसुविधा करण्यासाठी अतिरिक्त १४ कोटी रुपये त्वरीत देण्यात येतील. वनविभागाच्या प्रस्तावांना गती देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

वन विभागात पायाभूत सुविधा उत्तम : वन विभागाच्या इमारती, विश्रामगृह अतिशय उत्तम करण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण राज्यातील वन कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीसुध्दा कॅम्पा मधून उत्तम करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

असे राहील ताडोबा भवन : चंद्रपूर येथील मुल रस्त्यावर असलेल्या क्षेत्र संचालक, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खुल्या जागेत १८ कोटी ८ लक्ष खर्च करून नवीन ताडोबा भवन बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर (१ हजार ३६०.४७ चौ. मी.) १०० आसन क्षमतेचे ऑडीटोरीयम, पहिल्या माळ्यावर (१५५८.५८ चौ.मी.) उपवनरंक्षक (बफर) आणि उपवनसंरक्षक (कोअर) यांचे कार्यालय तर दुसऱ्या माळ्यावर (१ हजार ५६३.१४ चौ. मी.) क्षेत्रीय संचालक यांचे कार्यालय राहणार आहे. याशिवाय संकीर्ण बांधकामामध्ये पेव्हींग ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामांचा समावेश आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos