महत्वाच्या बातम्या

 दहावीच्या परीक्षेसाठी हॉलतिकीट मिळण्याची तारीख जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : दहावीच्या परीक्षेसाठी तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी आणखी जोमाने सुरु करा कारण, परीक्षेसाठीचे हॉलतिकीट मिळण्याची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतची माहिती दिली आहे. माहितीनुसार विद्यार्थ्यांना 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजल्यापासून हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध असतील. 

ऑनलाईन उपलब्ध असणारी ही हॉल तिकीट शाळांनीच विद्यार्थांना प्रिंट करून देणं अपेक्षित असेल. त्यासंदर्भातही शाळांना शिक्षण मंडळाकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये हॉल तिकीटाच्या प्रिंटवर अपेक्षित स्वाक्षरी व्यवस्थित आहेत की नाही इथपासून विद्यार्थ्यांकडून शुल्क न आकारण्याच्या सूचनांचा समावेश आहे. 

2 ते 25 मार्च या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा पार पडणार आहेत. परीक्षांपूर्वी 6 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजल्यापासून हॉल तिकीट मिळतील. प्रत्येक माध्यमानुसार हॉल तिकीटांमध्ये काही महत्त्वाचे बदल असतील किंवा काही चुका सुधारणं अपेक्षित असेल तर, याच्या दुरुस्तीसाठी शाळांनी विभागीय मंडळांशी संपर्क साधावा. हे करत असताना शाळांनी विद्यार्थ्यांचा फोटो, नाव, जन्मतारीख इत्यादी दुरुस्त्या करून त्याची प्रत तातडीने विभागीय मंडळाकडे पाठवावीत. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर रहावे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल अशी ताकीदच शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. अनेकदा उशिरा पोहोचण्याच्या वाव मिळाल्यास विद्यार्थी त्याचा गैरफायदा घेतात ही बाब निदर्शनास आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत 10 मिनिटांनी उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा कक्षात प्रवेश दिला जात होता. पण आता मात्र ही मुभाही नसेल त्यामुळे  परीक्षेसाठी निघताना हाती जास्त वेळ ठेवूनच निघा असा सल्लाही विद्यार्थी मित्रांना देण्यात येत आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos