भाजपचा गुजरातमध्ये २७ वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / गांधीनगर : गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या आप ने गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत प्रवेश केला आणि भाजप, कॉंग्रेस आणि आप यांच्यात त्रिपक्षीय लढत झाली. येथे मोठी चूरस पाहायला मिळेल असे बोलले जात होते. मात्र, भाजपने एकतर्फी राजकीय मैदान मारल्याचे दिसून येत आहे. मतमोजणीच्या दिवशी 182 मतदारसंघांसाठी लढणाऱ्या 1621 उमेदवारांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकाल जसा हाती येवू लागला तसा भाजपचा गोटात जल्लोष दिसून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह त्यांचे स्टार प्रचारक भाजपला मत देण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राज्यभर दौरा करत होते. अरविंद केजरीवाल यांच्या आपने गुजरात विधानसभा निवडणुकीत एक नवीन स्पर्धक निर्माण केला. मात्र, त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, बऱ्यापैकी मत आपल्या झोळीत टाकली. त्यामुळे त्यांना आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा एक मार्ग मोकळा झाला आहे. आता आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष होण्यास मोकळा झालाय, हीच काय ती आपची जमेची बाजू आहे.
राज्यात काँग्रेसच्या मतांचा वाटा आपने खाण्याची अपेक्षा होती. ते त्यांनी चोख काम बजावले. त्यामुळे राज्यात काँग्रेसची पकड गमावण्याची अपेक्षा होती, ती खरी ठरताना दिसून आलेय. काँग्रेस गेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष म्हणून उभा राहिला होता. आता त्यांच्या संख्येत मोठी घट होताना दिसून येत आहे. 78 जागा असताना यावेळी काँग्रेसने गुजरातकडे लक्ष दिलेच नाही. या ठिकाणी काँग्रेसचे स्टार प्रचारक रणधुमाळीपासून दूर होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. काँग्रेस आता जमतेम 22 जागा जिंकताना दिसून येत आहे. तर भाजपने 150 जागांवर थेट उडी घेताना दिसत आहे.
आपने गुजरातमध्ये राजकीय प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, आपचा प्रभाव मतदारांवर दिसून आला नाही. 6 जागांवर आप आघाडीवर आहे. त्यामुळे आमचेच सरकार येणार असे लिहून देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगलेच तोंडावर आपटले आहेत. गुजरात विधानसभेत भाजपला 150 जागा तर प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस केवळ 22 जागांवर तर नव्याने एंट्री मारलेल्या आप 6 जागांवर आघाडीवर आहे. तर 4 इतर उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे अंतिम निकाल हाती येईल, तेव्हा भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल आणि पुन्हा भाजप सत्तेत बसेल हे आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे 27 वर्षांनंतर भाजपची जादूच चालली, अशी प्रतिक्रिया राजकीय गोठातून व्यक्त होत आहे.
News - World