धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा, आमदार गजबे यांच्या प्रयत्नांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राच्या प्रलंबीत समस्या सोडविण्यासाठी बुधवारी मुंबई येथील मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,आमदार कृष्णा गजबे,आमदार संजय पुराम,संचालक भरत दुधनाग,अन्न पुरवठा विभागाचे सचिव पाठक, आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. याबैठकीत आमदार गजबे यानी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या  धान खरेदी बाबत येणाऱ्या विविध समस्याची प्रभावीपणे मांडणी करून काही मागण्या तातडीने मान्य करवून घेतल्या.  यामुळे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आ.गजबे यांनी दिली. 
 याशिवाय, सदर बैठकीत प्रति हेक्टर ४०  क्विंटल धान खरेदी करण्याचे शासनाने मान्य केले असून खरेदीत दोन टक्के तुटीला मान्यता देण्यात आली.  त्याचप्रमाणे  धान्याची उचल त्वरीत करण्यात येईल असे ठरविण्यात आले. उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात शासन स्तरावर प्रयत्न सुरू राहणार आहेत. 
 शनिवार  २ नोव्हेंबरला सकाळी साडे नऊ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात  आदिवासी विविध कार्यकारी संस्थाचे व्यवस्थापक,पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली असून या बैठकीला आमदार गजबे, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-01


Related Photos