महत्वाच्या बातम्या

 अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित : आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरुण लाखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विरोधातील सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने लाखानी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. या पार्श्वभूमीवर किशोर जोरगेवार यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लाखानी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने लाखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

या निवडीमुळे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून लाखानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि संघटनात्मक कार्याचा गौरव म्हणून ही निवड पाहिली जात आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले की, अरुण लाखानी यांची बिनविरोध निवड ही भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीची पावती आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या विकासासाठी निश्चितच होईल. विधान परिषदेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास आहे.

यावेळी जोरगेवार यांनी लाखानी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून या तीनही जिल्ह्यांच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. दरम्यान, बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत लाखानी यांचे अभिनंदन केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos