महत्वाच्या बातम्या

 मल्लेर (चक) येथे सेंद्रिय खत निर्मितीवर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मल्लेर (चक) गावात केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत सेंद्रिय खत निर्मिती व पुनर्वापर (Recycling of Organic Manure) आणि त्याचे महत्त्व या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या सेंद्रिय अवशेषांचा प्रभावी पुनर्वापर करून दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती कशी करता येते, याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी कंपोस्ट खत, वर्मी-कंपोस्ट तसेच नाडेप खत तयार करण्याच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे मातीची सुपीकता वाढते, जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक गुणवत्ता सुधारते तसेच पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होते, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान सेंद्रिय खतांचे फायदे, त्यांची निर्मिती प्रक्रिया, योग्य साठवणूक आणि शेतामध्ये प्रभावी वापर याबाबत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश सुरजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी प्राध्यापक किशोर गहाने सर तसेच मृदाशास्त्र सहाय्यक लिलारे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व सादरीकरण विद्यार्थिनी समीरा दोडके, रिचा धकाते, सुजाता फुलबेल, अदिती डोनाडकर आणि भूमिका धाबेकर यांनी केले.

गावातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सेंद्रिय खत निर्मितीबाबत उपयुक्त व व्यवहार्य माहिती मिळाल्याचे सांगितले. अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos