महत्वाच्या बातम्या

  वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू :  वाघाच्या जेरबंदीसाठी वन विभागाची धावपळ


- रायपूर जंगली परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले; ग्रामस्थांच्या मागण्यांवर वन विभागाकडून लेखी आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राखीव वन नियतक्षेत्र रायपूर जंगली, वनपरिक्षेत्र हिंगणी बफर क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भगवान चंद्रभान धुर्वे हे ९ सप्टेंबर रोजी शेतात जात असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यासह विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. त्यानुषंगाने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने वाघाला जेरबंद करण्यासह ग्रामस्थांच्या इतर मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

मृत भगवान धुर्वे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी वन विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. महसूल, पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची तसेच ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

वाघाच्या हालचालींवर नजर -
वाघाचा मागोवा घेण्यासाठी वन विभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. वाघाच्या हालचालींची माहिती संकलित करून त्याला जेरबंद करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, मुख्य वन्यजीव रक्षक, नागपूर यांची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, वाघाचा धोका लक्षात घेऊन संबंधित परिसरात वन विभागाची गस्त वाढविण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतात जाण्यासाठी मोठा व सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. गावालगतचा परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन वन विभागाने दिले आहे. तसेच वाघ जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थांना प्रत्यक्ष दाखविण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हंगामी मजुरांची संख्या वाढविणार -
रायपूर जंगली परिसरातील वन्यप्राण्यांच्या हालचालींवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी संबंधित नियतक्षेत्रात हंगामी मजुरांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मजुरांचा दर तीन महिन्यांनी फेरबदल करण्यात येणार असून, त्यामुळे परिसरातील गस्त आणि देखरेख अधिक प्रभावी करण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे.

सोलर फेन्सिंगचा प्रस्तावही मार्गी लावणार -
शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत सोलर फेन्सिंग उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जावर नियमानुसार कार्यवाही करून सोलर फेन्सिंगचा पुरवठा करण्यात येणार आहे.

रायपूर गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासनाकडे -
रायपूर गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्नही ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडला आहे. ग्रामपंचायतीमार्फत पुनर्वसनासंदर्भात ठराव सादर करण्यात आल्यानंतर तो शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाने आश्वस्त केले आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून वन्यप्राण्यांच्या धोक्याच्या छायेत असलेल्या ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या मागणीला आता शासनस्तरावर गती मिळण्याची शक्यता आहे.

वन, पोलिस व महसूल विभागाचा समन्वय -
घटनेनंतर वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक, सेलूचे तहसीलदार, पोलिस अधिकारी तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासन नियमांनुसार तत्काळ नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येईल, तसेच ग्रामस्थांनी केलेल्या उर्वरित मागण्या शासनाकडे पाठविण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वन, पोलिस आणि महसूल विभागाच्या समन्वयातून आवश्यक निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी दिली.

वाघाच्या हल्ल्यात झालेल्या या मृत्यूमुळे रायपूर जंगली परिसरातील वन्यप्राणी-मानव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाघाला जेरबंद करण्याची कार्यवाही आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर शासनाकडून होणारी अंमलबजावणी याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos