कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट : मुलाच्या कुऱ्हाडीने वडिलांचा जीव घेतला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील चिचबोडी येथे घरगुती वादातून मुलानेच जन्मदात्या वडिलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेने चिचबोडी गावासह संपूर्ण सावली तालुक्यात खळबळ उडाली असून, बापलेकाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत मुखरू कवडू मलोडे (५५) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा दिलीप मुखरू मलोडे (३५) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिचबोडी येथील मलोडे कुटुंबात काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. शनिवारी सायंकाळी सुमारास सात वाजता बापलेकामध्ये पुन्हा वाद झाला. वाद वाढत गेल्याने संतापलेल्या दिलीपने घरातील कुऱ्हाड उचलून वडील मुखरू यांच्या डोक्यावर आणि मानेवर घातक वार केले. या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मुखरू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी कुटुंबातील काही सदस्य सार्वजनिक गणपतीच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे घरातील हा रक्तरंजित प्रकार काही वेळाने उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावली उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, हल्ल्यानंतर दिलीप घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी शोधमोहीम राबवत आज त्याला व्याहाड येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या घटनेचा पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.




Petrol Price




