महत्वाच्या बातम्या

 निष्क्रीय खात्यातील रकमेवर खातेदाराचाच अधिकार


- आरबीआय–बँक ऑफ इंडियाच्या संयुक्त जागरूकता कार्यक्रमात मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या खात्यात निष्क्रीय अवस्थेत पडून असलेली रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडे जमा असली, तरी त्या रकमेवर खातेदाराचाच पूर्ण अधिकार आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून नियमानुसार ती रक्कम पुन्हा स्वतःच्या खात्यात जमा करून घेता येते, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय संचालक सचिन शेंडे यांनी केले.

ते बँक ऑफ इंडिया आरसेटी, गडचिरोलीच्या प्रांगणात आयोजित डीईएफ (डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड) जागरूकता कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आरबीआयच्या सहाय्यक महाप्रबंधक अंजना शामनाथ, बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक जयनारायण जी, जिल्हा अग्रणी प्रबंधक प्रशांत धौगळे, आरसेटी गडचिरोलीचे संचालक नागेश आष्टीकर, आरसेटीचे माजी प्रशिक्षणार्थी तसेच विविध बँकांचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सहाय्यक महाप्रबंधक अंजना शामनाथ यांनी निष्क्रीय खात्यातील रक्कम सक्रिय करण्यासाठी खातेदारांनी स्वतः पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी निष्क्रीय खात्यांवरील दावे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या अनेक संस्था व व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच बँक ऑफ इंडियाच्या आरसेटी अंतर्गत यशस्वी उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.

सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आरसेटी गडचिरोली परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी स्नेहल वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos