बाल एनसीडी तपासणी शिबिराचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : बालक व किशोरवयीन मुलांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी भंडारा जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. पूर्वी प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळणारे असंसर्गजन्य आजार (NCDs) आता बालकांमध्येही वाढत्या प्रमाणात आढळून येत असून, राज्यातील सुमारे ६० लाख बालके व किशोरवयीन मुले या आजारांच्या जोखमीखाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर बालकांमधील असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान, तज्ज्ञांकडून क्लिनिकल मूल्यांकन आणि वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यासाठी बालकातील असंसर्गजन्य आजार कार्यक्रमांतर्गत विशेष बाल एनसीडी तपासणी व क्लिनिकल मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले. युनिसेफ महाराष्ट्र आणि एम्स, नागपूर यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालय, भंडारा येथील बाल एनसीडी क्लिनिकमध्ये आयोजित या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित एनसीडी सप्ताहाचा हा एक भाग आहे. शिबिराचा उद्देश बालकांमधील एनसीडीचे लवकर निदान, तज्ज्ञांकडून क्लिनिकल तपासणी, आवश्यक उपचार, संदर्भ सेवा तसेच पुढील उपचार व पाठपुरावा यांची वेळेत जोडणी करणे हा होता.
शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत संदर्भित करण्यात आलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे ३०७ बालके व किशोरवयीन मुलांची विविध बालपणातील असंसर्गजन्य आजार व विकासात्मक स्थितींसाठी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध स्थितींचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये विकासात्मक विलंब ७१, लठ्ठपणा ४०, सिकल सेल आजार ३६, टाईप-१ मधुमेह ३४, सेरेब्रल पाल्सी २६, जन्मजात हृदयरोग २३, दमा १८, थायरॉईड १२ आणि इतर आजारांच्या ४० केसेस आढळून आल्या.
एम्स, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. उर्मिला डहाके, डॉ. आकाश बंग, डॉ. अभिषेक मधुरा, डॉ. रुपाली रोकडे, डॉ. शुभम मेश्राम आणि डॉ. उज्वल चावला यांनी बालकांचे क्लिनिकल मूल्यांकन केले. यासाठी जिल्हा रुग्णालय, भंडारा येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. धुर्वे, डॉ. थोटे आणि डॉ. साकोरे यांनी सहकार्य केले.
या शिबिराच्या माध्यमातून बालकांना तज्ज्ञ तपासणी, उपचारविषयक मार्गदर्शन, संदर्भ सेवा तसेच पुढील उपचार व पाठपुराव्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे बाल एनसीडीचे लवकर निदान आणि सातत्यपूर्ण उपचार सेवा अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे.
युनिसेफ महाराष्ट्राच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी मार्गदर्शन केले.




Petrol Price




