गडचांदूर पोलिसांनी उघडकीस आणली ट्रॉली चोरी : दोघे ताब्यात, ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मौजा आसन खुर्द येथून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा शोध घेण्यात गडचांदूर पोलिसांना यश आले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत चोरीस गेलेली ट्रॉली आणि चोरीसाठी वापरलेले ट्रॅक्टर जप्त केले. या कारवाईत एकूण पाच लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम भाऊराव ढेंगळे यांची एन.के. कंपनीची ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एमएच ३४ सीआर ४६०३ ही मौजा आसन येथून चोरीस गेली होती. याप्रकरणी त्यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या तपासातून प्रणय विजय जिवणे २६ वर्षे रा. घोन्सा, ता. वणी, जि. यवतमाळ आणि रजनिकांत बालाजी वल्लरवार ३६ वर्षे रा. रासा, ता. वणी, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान संबंधित ट्रॉली आसन खुर्द येथून चोरी केल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेली अंदाजे ७० हजार रुपये किमतीची ट्रॉली आणि गुन्ह्यात वापरलेले युवो टेक कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच २९ सीजे १७४९, ज्याची अंदाजे किंमत ५ लाख रुपये आहे, असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत. चोरीच्या घटनेचा माग काढून मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या कामगिरीची चर्चा होत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रमोद बानबले, पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, पोलीस हवालदार शितल बोरकर, बलवंत शर्मा, साईनाथ उपरे, सूरज आणि प्रकाश यांनी केली.




Petrol Price




