महत्वाच्या बातम्या

 अपघातातील जखमींसाठी आरमोरीतील तरुणांचा एक हात मदतीचा ठरतोय जीवनदायी


- व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे तातडीने उपचार मिळवून देण्याचा अनोखा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मिथुन धोडरे / गडचिरोली : रस्त्यावर होणारे भीषण अपघात आणि त्यानंतर वेळेत मदत व उपचार न मिळाल्याने निष्पाप अपघातग्रस्तांना गमवावा लागणारा जीव, ही एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब बनली आहे. अपघातानंतर जखमी व्यक्ती रस्त्यावर पडून राहतात, परंतु भीतीपोटी किंवा कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. यामुळे रुग्णाला गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत मिळत नाही. हीच अडचण ओळखून, आरमोरीतील सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला एक हात मदतीचा हा व्हॉट्सॲप ग्रुप आज अपघातग्रस्त व्यक्तींसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी आणि संकटमोचक ठरत आहे.

अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी, त्याला वेळेत रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार व्हावेत आणि त्याचे प्राण वाचावेत या मुख्य उद्देशाने नंदू नाकतोडे यांनी या उपक्रमाची पायाभरणी केली. या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आरमोरी शहर व परिसरातील संवेदनशील नागरिक, रुग्णवाहिका चालक, डॉक्टर आणि स्थानिक तरुणांचा मोठ्या संख्येने समावेश करण्यात आला आहे.

आरमोरी व लगतच्या परिसरात कुठेही अपघात झाल्यास, घटनेची माहिती, फोटो आणि लोकेशन ग्रुपवर तात्काळ शेअर केले जाते. संदेश मिळताच घटनास्थळाच्या जवळ असलेले सदस्य क्षणाचाही विलंब न लावता तेथे धाव घेतात. जखमी व्यक्तीची ओळख पटवून ही माहिती त्याच्या नातेवाईकांपर्यंत अवघ्या काही मिनिटांत पोहोचवली जाते. यासोबतच जखमींना तातडीने जवळच्या शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार सुरू केले जातात. तसेच, उपचारादरम्यान रक्ताची गरज भासल्यास त्वरित रक्तदाते उपलब्ध करून देण्याचे कार्यही या ग्रुपचे सदस्य तत्परतेने करतात.

डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा सामाजिक हितासाठी कसा आदर्श वापर करता येतो, याचे उत्तम उदाहरण आरमोरीतील तरुणांनी घालून दिले आहे. एका मेसेजच्या बळावर आजवर अनेक गंभीर जखमींना वेळेवर उपचार मिळून ते सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. आरमोरीतील तरुणांच्या या निस्वार्थ आणि जीवनदायी उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून जोरदार कौतुक केले जात आहे.

आरमोरी, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वडसा या शहरांसह परिसरातील ग्रामीण भागातील संवेदनशील युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या उपक्रमात एकत्र आणण्यात आले आहे. परिसरात कुठेही भीषण अपघात झाल्यास अथवा गंभीर रुग्णाला तातडीने रक्ताची गरज भासल्यास, पीडित व्यक्तीला क्षणाचाही विलंब न होता तातडीने मदत मिळावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे. गोल्डन अवरमध्ये योग्य उपचार आणि वेळेवर रक्त उपलब्ध करून देऊन एखाद्या गरजूचे प्राण वाचवणे, या भावनेतूनच हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
- नंदू नाकतोडे





  Print






Related Photos