महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा थरारक प्रयत्न : डोळ्यात मिरची पूड फेकून पळवण्याचा डाव फसला


- चामोर्शी रोडवरील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : दुकान बंद करून दुचाकीने घरी परतणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून, त्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड फेकत मौल्यवान ऐवज लुटण्याचा थरारक प्रकार गडचिरोली शहरात घडला. मात्र, व्यापाऱ्याने दाखवलेले प्रसंगावधान आणि मारलेल्या आरडाओरडमुळे घाबरलेल्या भामट्यांनी तेथून काढता पाय घेतला. चामोर्शी रोडवरील जंगल कामगार सोसायटी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. महिनाभरात व्यापाऱ्याला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना असल्याने व्यापारी वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सुरेश भोजापुरे असे लुटमारीचा प्रयत्न अयशस्वी ठरवलेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. रोजच्याप्रमाणे भोजापुरे यांनी रात्री दुकान बंद केले आणि दुकानातील सोने-चांदीचे दागिने दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते चामोर्शी रोडने घरी जाण्यास निघाले. चामोर्शी रोडवरील मडावी यांच्या पेट्रोल पंपाजवळ पोहोचताच, तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांची दुचाकी अडवली. काही समजण्याच्या आतच या दोन्ही अज्ञात आरोपींनी भोजापुरे यांच्या अंगावर आणि चेहऱ्यावर लाल मिरची पावडर फेकली अन् डिक्कीतील ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला.

अचानक झालेल्या या हल्ल्याने भोजापुरे काही क्षण गोंधळले; मात्र त्यांनी तत्काळ स्वतःला सावरून मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. गजबजलेल्या परिसराच्या जवळच ही घटना घडल्याने आणि व्यापाऱ्याच्या आरडाओरडमुळे पकडले जाण्याच्या भीतीने तोंड बांधलेल्या त्या दोन्ही अज्ञात आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. भोजापुरे यांच्या सतर्कतेमुळे दुचाकीच्या डिक्कीतील लाखो रुपयांचा सोने-चांदीचा ऐवज पूर्णपणे सुरक्षित राहिला.

सीसीटीव्ही फुटेज आणि श्वानपथकाच्या मदतीने तपास वेगाने -
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तोंडाला रुमाल बांधून पसार झालेल्या त्या दोन अज्ञात आरोपींचा माग काढण्यासाठी श्वानपथक तसेच गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींनी आधीपासूनच व्यापाऱ्याची रेकी केली होती का, या दृष्टीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.





  Print






Related Photos