जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील निष्काळजीपणाचा आरोप : आठ दिवसांत दोन मातांचा मृत्यू, नवजात बाळाचाही जीव गेला


- नाजुका राऊत यांचा प्रसूतीनंतर रक्तस्त्रावामुळे मृत्यू; रक्त मिळण्यास विलंब झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, सखोल चौकशीची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील प्रसूतीसेवेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. चामोर्शी येथील गर्भवती महिलेच्या प्रसूतीदरम्यान मृत्यूला आठवडा पूर्ण होत नाही तोच २९ ऑगस्टच्या मध्यरात्री प्रसूतीनंतर आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या महिलेच्या नवजात बाळाचाही प्रसूतीनंतर काही वेळातच मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, रुग्णालयातील प्रसूतीसेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाजुका दिवाकर राऊत २८ वर्षे रा. कोजबी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर असे मृत महिलेचे नाव आहे. नाजुका यांचे माहेर सावली तालुक्यातील चकपिरंजी येथे आहे.
बोदलीहून रुग्णालयात दाखल -
प्रसूतीसाठी नाजुका राऊत यांना २८ ऑगस्ट रोजी रात्री १.२३ वाजता बोदली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता त्यांची सामान्य प्रसूती झाली. प्रसूतीनंतर काही वेळातच अडीच किलो वजनाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी सुमारे ८ वाजता नाजुका यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली.
रक्तस्त्रावानंतर शस्त्रक्रिया -
महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्यानंतर ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके आणि डॉ. प्रशांत आखाडे यांना पाचारण करण्यात आले. डॉक्टर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर नाजुका यांची तपासणी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्यासाठी शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले. त्यानंतर रक्तस्त्राव थांबला आणि नाजुका यांना रक्त देण्यात आले. दुपारी सुमारे ३ वाजता त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती होती. मात्र, मध्यरात्रीनंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. रात्री १२.३० वाजल्यानंतर त्यांना झटके येण्यास सुरुवात झाली. उपचार सुरू असतानाच रात्री सुमारे १.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
रक्त मिळण्यास विलंब झाल्याचा नातेवाईकांचा आरोप -
नाजुका यांची प्रकृती गंभीर असताना रक्त उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेत काहीसा विलंब झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोग्य यंत्रणेच्या कथित निष्काळजीपणामुळेच माता आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या उपचारादरम्यान नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली, रक्त उपलब्ध होण्यास विलंब झाला का, उपचारात काही त्रुटी राहिल्या का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
आठ दिवसांत दोन मातांचा मृत्यू -
यापूर्वी सुमारे आठ दिवसांपूर्वी चामोर्शी येथील जिजा सातर २६ वर्षे या गर्भवती महिलेचा याच जिल्हा महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेची चर्चा सुरू असतानाच नाजुका राऊत यांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. अल्पावधीत दोन मातांचा मृत्यू आणि त्यापैकी एका प्रकरणात नवजात बाळाचाही मृत्यू झाल्याने जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील प्रसूतीसेवेबाबत चिंता व्यक्त होत आहे. गंभीर अवस्थेतील गर्भवती महिलांसाठीची आपत्कालीन उपचार व्यवस्था, रक्ताची उपलब्धता आणि तत्काळ वैद्यकीय प्रतिसाद यंत्रणा यांची कार्यक्षमता तपासण्याची मागणीही पुढे येत आहे.
वैद्यकीय अधीक्षकांशी संपर्क होऊ शकला नाही -
या घटनेबाबत जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी केलेल्या आरोपांवर रुग्णालय प्रशासनाची अधिकृत बाजू समोर येऊ शकली नाही. माता आणि नवजात बाळाच्या मृत्यूमागील वैद्यकीय कारणे तसेच उपचारादरम्यानची वस्तुस्थिती चौकशीतून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. सलग घडलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोष किंवा त्रुटी आढळल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.




Petrol Price




