हिंगणघाट शहराच्या विकासासाठी आवश्यक सर्व सहकार्य कर : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

- हिंगणघाट येथे नगरसेवकांसोबत जनसंवाद कार्यक्रम
- विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कोणत्याही शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये त्या-त्या नगरपरिषदेची भूमिका अत्यंत महत्वाची असते. हिंगणघाट नगरपरिषदेने शहराच्या विकासासाठी प्राधान्यक्रमाने करावयाच्या कामांची यादी तयार करावी. हिंगणघाटच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली हिंगणघाट नगरपरिषद कार्यालयातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार समीर कुणावार, नगर परिषदेच्या अध्यक्षा डॉ. नयना तुळसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुधीर कोठारी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, उपविभागीय अधिकारी तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नदीघाट विकास आराखडा, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नगर परिषद शाळांना निधी उपलब्ध करून देणे, नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीसाठी लिफ्ट उभारणी, घाट व जलतरंग तलाव परिसराचा विकास तसेच टाकाऊ जागेवर मैदान उभारणी यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना करा. शहरात संकुल उभारणे, जनसहभागातून वृक्षलागवड करणे, वाहतुकीसाठी गतिरोधक बसविणे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करा.
जन्म-मृत्यू नोंदणीची प्रकरणे तहसीलमार्फत तातडीने निकाली काढण्याचे, तसेच नागरिकांना मालमत्ता पत्रिका त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले.
समुद्रपूर येथे डम्पिंग ग्राउंडसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आली. जनसंवाद कार्यक्रमात नगर परिषद सदस्यांनी शहरातील विविध विकासकामांसंदर्भात पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे निवेदने सादर केली. या निवेदनांवर संबंधित विभागाने कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिले.
News - Wardha




Petrol Price




