आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून साकारलेल्या जीएसटी भवनाचे १८ जूनला लोकार्पण

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन; २९.९९ कोटींच्या अत्याधुनिक प्रकल्पामुळे चंद्रपूरच्या प्रशासकीय विकासाला नवी दिशा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर घालणाऱ्या नव्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) भवनाचे लोकार्पण येत्या १८ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्यप्रणालीद्वारे या अत्याधुनिक भवनाचे उद्घाटन करणार असून, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके हे देखील दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
चंद्रपूरमध्ये स्वतंत्र व आधुनिक जीएसटी भवन उभारण्याची संकल्पना माजी वित्तमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वित्तमंत्रीपदाच्या कार्यकाळात मांडली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला १५ मे २०१७ रोजी २१ कोटी ४३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. त्यानंतर बांधकाम खर्चात वाढ झाल्याने २४ जानेवारी २०२४ रोजी २९ कोटी ९९ लाख ८० हजार रुपयांच्या सुधारित खर्चास मंजुरी देण्यात आली. आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे साकारलेले हे अत्याधुनिक भवन आता लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे.
जलनगर वॉर्ड परिसरात उभारण्यात आलेले हे चार मजली (जी+३) अत्याधुनिक भवन सुमारे ५४०७ चौरस मीटर क्षेत्रफळात विकसित करण्यात आले आहे. करदाते, व्यापारी, उद्योजक तसेच विभागीय अधिकाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भवनामध्ये प्रशासकीय कार्यालये, प्रशिक्षण सभागृह, परिषद कक्ष, वातानुकूलित व्यवस्था, लिफ्ट, वाहनतळ, अग्निसुरक्षा यंत्रणा तसेच नागरिकाभिमुख सेवा सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
या नव्या भवनामुळे वस्तू व सेवा कर विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून, करदाते व व्यापाऱ्यांना विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच नागरिकांना अधिक सुलभ आणि दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने हे भवन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच जीएसटी भवनाची पाहणी करून विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी इमारतीतील सुविधा, उर्वरित कामे आणि संभाव्य त्रुटींची तपासणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. लोकार्पणापूर्वी सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
चंद्रपूरच्या प्रशासकीय विकासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात असून, जीएसटी भवनाच्या लोकार्पणामुळे जिल्ह्यातील कर प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा प्रकल्प चंद्रपूरच्या प्रशासकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.
News - Chandrapur




Petrol Price




