मानसिक छळ : उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू आईस्क्रीम विक्रेत्याच्या आत्मदहन प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सततचा मानसिक छळ, खोट्या तक्रारी आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून एका आईस्क्रीम विक्रेत्याने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना राजुरा शहरात उघडकीस आली आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत उपचार सुरू असताना संबंधित तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
मृत तरुणाचे नाव राजु जोधाजी गाडरी (३२), रा. रामनगर कॉलनी, राजुरा, मूळगाव मिलवाडा, राजस्थान असे असून तो आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करीत होता. या प्रकरणी सरिता रामकिशोर सिंह उर्फ पुसनाके रा. बेघर वस्ती, राजुरा व राजेंद्र विठ्ठल डोहे रा. आठवडी बाजार, राजुरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रीना गणेश आत्राम रा. पेठ वार्ड, राजुरा यांनी दिलेल्या तक्रारीत राजु गाडरी व सरिता सिंह यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध असल्याचे नमूद केले आहे. मात्र नंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाले. सरिता सिंह वारंवार आर्थिक मदत मागत होती. पैसे देणे बंद केल्यानंतर तिने राजु गाडरी व त्याच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याच्या धमक्या देत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सरिता सिंह व तिच्या परिवाराकडून वारंवार शिवीगाळ, धमक्या, खोट्या तक्रारी तसेच बदनामी करण्यात येत होती. यामध्ये राजेंद्र डोहे हा साथ देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. धंदा बंद कर, नाहीतर गोळ्या घालीन,” अशी धमकी देण्यात आल्याचेही बयाणात नमूद आहे.
दरम्यान, २५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी परिसरात राजु गाडरी हा तक्रारदार महिलेला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले होते. सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे सांगत त्याने स्वतःला पेटवून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्याला प्रथम चंद्रपूर येथील पालीवाल रुग्णालय, त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय व पुढे कोलसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला उदयपूर (राजस्थान) येथील महाराणा भोपाळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान ९ मे २०२६ रोजी त्याचा मृत्यू झाला.
तक्रारीत असा दावाही करण्यात आला आहे की, उपचारादरम्यान राजु गाडरी याने एका व्हिडिओमध्ये सरिता सिंह व राजेंद्र डोहे यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला होता. तसेच पोलिसांत वारंवार खोट्या तक्रारी दिल्यामुळे आपण त्रस्त झालो असल्याचे त्याने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजुरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८ व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




