सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर घातलेली बंदी उठविली : राज्य सरकारची सशर्त परवानगी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्य सरकारने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर घातलेली बंदी उठविली आहे. प्लास्टिकच्या ६० जीएसएमपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या, पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, चमचे, काटे यांच्या वापरण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
मार्च २०१८ पासून या वस्तूंच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. बंदी शिथिल करण्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारकडून गुरुवारी जारी करण्यात आली आहे.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने २३ मार्च २०१८ रोजी सिंगल यूज प्लास्टिकसह प्लास्टिक पॅकिंगवरही बंदी घातली हाेती. त्यानंतर ही अट शिथिलही करण्यात आली होती. रामदास कदम पर्यावरणमंत्री असताना बंदी राज्यभर लागू करण्यात आली. प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या. केंद्र सरकारनेही १ जुलै रोजी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आदेश जारी केला.
बंदीमुळे छोट्या प्रमाणावर काम करणाऱ्या सहा लाखांहून अधिक युवक व महिलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने ही बंदी उठवावी अशी मागणी लघु उद्योजकांकडून करण्यात येत होती. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तसेच लघु उद्योजकांच्या संघटनांकडून ही बंदी उठविण्याची मागणी केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कडूनही ३१ जुलै रोजी संभाजीनगर येथील राज्यस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर यासंदर्भात अडचणी मांडण्यात आल्या होत्या.
n कंपोस्टेबल पदार्थांपासून, प्लास्टिकपासून बनवलेल्या स्ट्रॉ, ताट, कप्स, प्लेटस्, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, कंटेनर इ. अशा वस्तू कंपोस्टेबल असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घ्यावे.
सिंगल यूज प्लास्टिक बंदीचा आदेश लागू केल्यानंतर त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करताना केलेल्या बदलात सुधारणा केली आहे. आता बंदीतून ६० जीएसएमपेक्षा अधिक जाडीचे नॉनवूव्हन पॉलिप्रॉपिलीन बॅग्ज व पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, प्लेटस् या वस्तूंना बंदीतून वगळले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने याविषयी पाठपुरावा केला होता.
- ललित गांधी, अध्यक्ष,
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
News - Rajy