लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिपचा भव्य पदवीदान सोहळा


- ४०० विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणासह लॉयड्स समूहात रोजगाराची संधी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिप (एलएमजीएसई) तर्फे बुधवारी आयोजित करण्यात आलेला पदवीदान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४०० विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लॉयड्स समूहात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या भव्य सोहळ्याला प्रसिद्ध बँकर, समाजसेविका आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन होते. यावेळी ज्येष्ठ लोकप्रतिनिधी अरविंद नामदेवराव पोरेड्डीवार, लॉयड्स फेरा फोर्ज ग्लोबल प्रा. लि.च्या संचालिका अलका मिश्रा, लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका कीर्थी रेड्डी तसेच लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक एस. वेंकटेश्वरन यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमृता फडणवीस यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील युवक-युवतींना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी एलएमजीएसईने उभारलेल्या सुविधा आणि राबविलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलींना तांत्रिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविण्याचा संस्थेचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने विकासाचा आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण घेतलेल्या मुलींच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होण्याची तयारी ही संस्थेच्या कार्याची मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीतील लॉयड्स-कर्टिन कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी इग्नासियस बडा याने ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठातून इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्याचा अभिमानास्पद उल्लेख केला. या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा तसेच परदेशातील वास्तव्याचा संपूर्ण खर्च लॉयड्सने उचलल्याचे सांगताना, स्थानिक आदिवासी युवकाने अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय पदवी संपादन करणे हा गडचिरोलीसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, कौशल्याधारित शिक्षणाशिवाय औद्योगिक आणि आर्थिक विकास शक्य नाही. त्यामुळे एलएमजीएसईच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देऊन बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार केले जात आहे. आज प्रशिक्षण पूर्ण केलेले अनेक युवक-युवती लॉयड्समध्ये कार्यरत असून, त्यांना केवळ रोजगारच नव्हे तर ईएसओपी (ESOP) योजनेअंतर्गत कंपनीचे समभाग देऊन कंपनीचे भागीदार बनविण्याचा अभिनव उपक्रमही राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी लॉयड्स कटिबद्ध असल्याचे सांगताना प्रभाकरन यांनी सामाजिक बांधिलकीतून हेडरी येथे उभारण्यात आलेल्या बहुविशेषता रुग्णालयाचा उल्लेख केला. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच महिलांना वाहतूक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतात प्रथमच महिला चालकांसाठी शौचालय सुविधेसह सुसज्ज ट्रेलर ट्रक सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय गडचिरोलीतील युवकांसाठी भविष्यात अत्याधुनिक फ्लाइंग स्कूल सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विमानवाहतूक क्षेत्रात करिअर घडविण्याची नवी संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लॉयड्सच्या विविध सामाजिक विकास प्रकल्पांचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यामध्ये लॉयड्स एकलव्य वसतिगृह, लॉयड्स शक्ती वसतिगृह, लॉयड्स भोजनालय, लॉयड्स ड्रायव्हिंग स्कूल, लॉयड्स सक्षम गॅरेज तसेच लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिपच्या अधिकृत संकेतस्थळाचा समावेश होता. या प्रकल्पांमुळे शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि समाज सक्षमीकरणाच्या क्षेत्रात लॉयड्सची बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
भव्य पदवीदान सोहळ्याच्या निमित्ताने ४०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक यशाचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून गडचिरोलीतील युवक-युवतींना सक्षम करण्याचा लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिपचा संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
News - Gadchiroli




Petrol Price




