महत्वाच्या बातम्या

 कृत्रिम MRP वाढीविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे धरणे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : दैनंदिन वापराच्या वस्तू, औषधे, बियाणे, कीटकनाशके तसेच कृषी निविष्ठांवर कृत्रिमरीत्या वाढविण्यात येणाऱ्या कमाल किरकोळ किंमती (MRP) मुळे ग्राहक व शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले.

उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि वाजवी नफा यावर आधारित SRP (Suggested Retail Price) प्रणाली लागू करावी, उत्पादन खर्चाची माहिती सार्वजनिक करावी, QR कोडद्वारे किंमत पारदर्शकता आणावी तसेच भ्रामक सवलती आणि अवाजवी नफेखोरी रोखण्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच MRP सुधारणा व किंमत नियंत्रणासंदर्भातील अभ्यास समित्यांमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली. ग्राहक, शेतकरी व रुग्णांचे आर्थिक हित जपण्यासाठी सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

१२ जून रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे MRP विरोधात राष्ट्रीय स्तरावरील धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने देशभरातील जिल्हा व तालुका मुख्यालयांवरही धरणे आंदोलन करण्यात आले. गडचिरोली येथे कारगिल चौकात धरणे आंदोलन करून नागरिकांना MRP संदर्भात माहिती देण्यात आली तसेच ग्राहक जनजागृती करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी वानखडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष उदय धकाते, प्रांत सदस्य चंद्रकांत पतरंगे, मार्गदर्शक विजय कोतपल्लीवार, उपाध्यक्ष विजय साळवे, महिला प्रमुख सुचिता धकाते, प्रा. सुनीता साळवे, एम. डी. मेश्राम, समाजसेवक दिलीप सारडा, नैताम, नरेश काहूरके, मनीष हांडे यांच्यासह ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos