भाऊबीजेसाठी जाताना आहके कुटुंबाच्या दुचाकीचा भीषण अपघात : तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू


- आई-वडील गंभीर जखमी; पाच वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला, समृद्धी महामार्गालगत ठाणेगाव परिसरातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भाऊबीजेच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात असलेल्या आहके कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या कठड्याला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले. या अपघातात पाच वर्षीय मुलगा सुदैवाने सुखरूप बचावला. ही घटना शनिवारी दुपारी समृद्धी महामार्गालगतच्या ठाणेगाव परिसरात घडली.
या अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव अनन्या नरेश आहके असे आहे. तिचे वडील नरेश आहके (३६) आणि आई मीरा आहके (३४) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर पाच वर्षीय रुद्रेश आहके हा सुदैवाने सुरक्षित आहे. आहके कुटुंबातील चौघेही देवळी येथून पुलगावमार्गे तळेगाव येथे भाऊबीजेच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होते.
दरम्यान, समृद्धी महामार्गालगतच्या ठाणेगाव परिसरातून जात असताना दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्यालगत असलेल्या कठड्यावर जोरात आदळली. या धडकेत आईजवळ असलेली अनन्या खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या भीषण धडकेत नरेश आणि मीरा आहके हे दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, त्यांच्यासोबत असलेला पाच वर्षीय रुद्रेश या अपघातातून सुखरूप बचावला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यांना तातडीने पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही वर्धा येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भाऊबीजेच्या आनंदासाठी निघालेल्या आहके कुटुंबावर या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन वर्षीय अनन्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचा पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत.




Petrol Price




