गडचिरोली : मोबाईल व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक : पिता-पुत्रांसह तिघांविरुद्ध गुन्हा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील आठवडी बाजार परिसरात मोबाइल शॉपच्या नावाखाली व्यापारी व नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. विश्वास संपादन करून नफ्याचे आमिष दाखवत लाखो रुपये हातउसने घेऊन परत न केल्याप्रकरणी पिता-पुत्रांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई १३ जून रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात करण्यात आली. कमल राजेश मेघवानी, विनय राजेश मेघवानी आणि त्यांचे वडील राजेश पाथूमल मेघवानी (सर्व रा. परतवाडा, जि. अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार रफीक जब्बार कुरेशी (वय ६१, रा. अमिर्झा, ता. गडचिरोली) यांच्या तक्रारीनुसार, सन २०२४ च्या सुरुवातीला त्यांचा व्यावसायिक संबंध आरोपी कमल मेघवानी याच्याशी आला. त्यानंतर कमलने विश्वास संपादन करून हळूहळू कौटुंबिक संबंध निर्माण केले.
या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपींनी मे २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत व्यवसायातील अडचण व आर्थिक गरज असल्याचे भासवून कुरेशी कुटुंबाकडून ऑनलाइन पद्धतीने २५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली. ही रक्कम आरोपींच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती.
यानंतर केवळ १० लाख २६ हजार ५०० रुपये परत करण्यात आले, तर उर्वरित १३ लाख ६० हजार रुपये देणे बाकी असल्याचे समोर आले. त्यासाठी दिलेला चेकही वठला नाही.
दरम्यान, पैसे परत मागण्यासाठी तक्रारदार आरोपींच्या घरी गेले असता ते कुटुंबासह गडचिरोली सोडून फरार झाल्याचे समोर आले.
या प्रकरणात केवळ एकच घटना नसून आरोपींनी शहरात अनेक व्यापारी व नागरिकांना नवीन मोबाइल शॉप उघडून देणे, व्यवसायात नफा मिळवून देणे आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी. आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्याबद्दल माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




