महत्वाच्या बातम्या

 हवाई प्रवाशांसाठी दिलासा : ४८ तासांत तिकीट रद्दीकरण मोफत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : वारंवार हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान तिकीट रद्दीकरण आणि परताव्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमांनुसार प्रवाशांना बुकिंग केल्याच्या ४८ तासांच्या आत तिकीट रद्द करण्याची किंवा प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळणार आहे.  

ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे तिकिटे घेतलेल्या प्रवाशांनाही याचा लाभ मिळणार असून, अशा प्रकरणांमध्ये परताव्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच राहील. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

डीजीसीएच्या या प्रस्तावानुसार, प्रवाशांना लुक-इन पिरियड नावाचा ४८ तासांचा कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत तिकीट रद्द केल्यास कोणतेही मोठे शुल्क आकारले जाणार नाही. सध्या प्रत्येक एअरलाईन कंपनी आपल्या सोयीनुसार रद्दीकरण शुल्क आकारत असल्याने प्रवाशांचे मोठे नुकसान होत होते.  

या नव्या नियमांसाठी काही अटी ठरवण्यात आल्या आहेत. देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवासाची वेळ बुकिंगपासून किमान पाच दिवसांनंतर असावी, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ती किमान १५ दिवसांनंतरची असावी. या कालावधीपेक्षा कमी वेळेत केलेल्या प्रवासांवर मात्र पूर्वीचेच शुल्क लागू राहणार आहे.  

तिकीट रद्द झाल्यानंतर परताव्याची रक्कम प्रवाशाच्या पसंतीनुसार दिली जाईल. एअरलाईन्सना हा परतावा २१ कामकाजाच्या दिवसांत पूर्ण करावा लागेल. प्रवाशांकडून जास्त रद्दीकरण शुल्काबाबत सतत तक्रारी येत होत्या. काही वेळा विमान कंपन्या तिकिटाच्या किमतीच्या अर्ध्याहून अधिक कपात करत असत.  

या पार्श्वभूमीवर डीजीसीएचे हे पाऊल प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या या प्रस्तावाचा मसुदा तयार असून, ३० नोव्हेंबरपर्यंत लोकांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत. हे नियम लागू झाल्यास, हवाई प्रवासातील तिकीट बुकिंग आणि परताव्याच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत.  





  Print






News - Rajy




Related Photos