महत्वाच्या बातम्या

 बहुजनांनो जागे व्हा... मनुस्मृती वाद्यांकडून संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 


- नवरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व सौंदर्यकरणाचा लोकार्पण सोहळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका / सिंदेवाही : देशात धर्मांधतेतून विष पेरण्याचे काम सुरू आहे. जाती जातींमध्ये भांडणे लावून सत्ता काबीज करणाऱ्या मनुस्मृतिवाद्यांकडून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या देशाच्या पवित्र संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न चालविल्या जात आहे. अशा देश विघातक प्रवृत्तीस ठेचून काढणे काळाची गरज असून याकरिता बहुजनांनो जागे व्हा अन्यथा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नवरगाव येथे शहर काँग्रेस कमिटी तथा बौद्ध नगर स्मारक समिती द्वारा आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व सौंदर्यकरणाचा लोकार्पण सोहळा याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

आयोजित सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली चे माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुरावजी गेडाम, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, सरपंच राहुल बोडणे, उपसरपंच स्वाती लोणकर, शहर काँग्रेस अध्यक्ष सुशांत बोडणे, माजी सभापती वीरेंद्र जयस्वाल, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे ग्रा. प. सदस्य दीपक चहांदे, पंकज उईके, श्रीकांत हेडाऊ, पांडुरंग वाघमारे, प्रकाश चहांदे, नागदेवते प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवरगाव येथे स्थापित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा हा नेहमी समता बंधुत्व व स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन करून बहुजनांना जगण्याचा अधिकार देण्यासाठी संविधान रुपी कवच दिले. व हेच संविधान तुमचे खरे रक्षक आहे. धर्माधर्मात विष पेरून सत्ता काबीज करणाऱ्यांकडून देशाला गुलाम बनवण्याची प्रयत्न सुरू असताना बहुजनांनी जागे होऊन याचा प्रतिकार केला पाहिजे. सध्या स्थितीत राज्यातील इजा बिजा व तिजा सरकारकडून संपत्ती लुटण्याचे काम जोरात सुरू असून राज्यावर कर्जाचे डोंगर बेरोजगारी व प्रचंड महागाई असे संकट ओढावले आहे. क्षेत्रातील नवरगाव शहरासाठी उत्तम दर्जाची व्यायाम शाळा, दोन कोटीची ई लायब्ररी, सुसज्ज इमारतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र, कोट्यावधींची नळ योजना, सोबतच येणाऱ्या काळात स्थानिक शहराच्या मुख्य चौकातच छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक व विचारांचे आदान प्रदान होण्याकरिता संविधान भवनाची निर्मिती करू असेही ते यावेळी म्हणाले.

तर अध्यक्षीय भाषणामध्ये ॲड. राम मेश्राम म्हणाले की, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बौद्ध विहारांना थायलंड व लदाख येथून बौद्ध मूर्ती उपलब्ध करून दिल्या. सर्व समाजाचे हित जोकर असणारे वडेट्टीवार हे राजकारणासह समाजकारणातही अग्रेसर आहेत. देशात सध्याची स्थिती पाहता लोकशाही जर टिकवायची असेल तर संविधान टिकविण्यासाठी प्रत्येक समाजाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणी करिता सहकार्य करणाऱ्या प्रत्येक नागरिक व समाज प्रतिनिधींचे सत्कार करण्यात आले.

यानंतर झाडीपट्टीतील प्रसिद्ध गायक तथा प्रबोधन कर्ते वादळ वारा फेम अनिरुद्ध वनकर वसंत यांचा शिवराय ते भिमराय गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश भोयर प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य दीपक चहांदे यांनी केले. आयोजित कार्यक्रमास नवरगाव शहरासह आसपासच्या ग्राम खेड्यातील नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos