बल्लारपूर नगर परिषद शाळांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नगर परिषद बल्लारपूरच्या अधिनस्त प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद २१ ऑगस्ट रोजी पीएम श्रीनगर परिषद गांधी विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई होत्या. कार्यक्रमाला बल्लारपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी, शिक्षण सभापती कु. प्रियंका थुलकर, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, शिक्षण सल्लागार नागेश नीत, गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन कडूकर, गडचिरोलीचे उपक्रमशील शिक्षक सुधीर गोहणे, समूह समन्वयक माया वाटोरे, वैशाली धार्मिक, केंद्रप्रमुख श्रीनिवास रायला, सुदाम राठोड व अमोल टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिक्षण परिषदेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अध्ययन अनुभवांचे आदान-प्रदान, शिक्षकांच्या अडचणींवर चर्चा, क्षमता आधारित वर्ग नियोजन, केंद्र संसाधन गटाचे मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास चालना देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच वर्ग अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, निपुण भारत अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, बहुवर्ग अध्यापन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा, शिक्षणात पालकांचा सक्रिय सहभाग आणि लोकवर्गणीतून शाळेच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवरही मार्गदर्शन करण्यात आले.
शालेय गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विशेष मार्गदर्शक म्हणून पीएम जवाहरलाल नेहरू नगर परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा उपक्रमशील शिक्षक सुधीर गोहणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी गडचिरोली येथील नेहरू शाळेला वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांचा अनुभव शिक्षकांसमोर मांडला. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा प्रेरणादायी प्रवास सांगत त्यांनी विविध शैक्षणिक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्रीनिवास रायला यांनी केले. संचालन कंत्राटी शिक्षक सचिन बल्की यांनी, तर आभार प्रदर्शन दुष्यंत वैरागडे यांनी केले. शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची माहिती बिनय दत्ता यांनी दिली. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी नगर परिषद गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष सहकार्य केले. नगर परिषदेच्या विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने परिषदेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.




Petrol Price




