कीटकनाशक फवारणी करताना काळजी घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात शेती व्यवसायात पिकांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास शेतकरी व शेतमजुरांना गंभीर विषबाधेचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर, शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना अत्यंत काळजी घेण्याचे आणि खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कीटकनाशके नेहमी शिफारस केलेल्या व मान्यताप्राप्त कंपन्यांकडूनच खरेदी करावीत. डब्ब्यांवरील लाल, पिवळा, निळा किंवा हिरवा त्रिकोण पाहून त्यांची विषारीपणाची तीव्रता ओळखावी. लाल त्रिकोण सर्वाधिक विषारी तर हिरवा सर्वात कमी विषारी दर्शवतो. खूपच आवश्यकता असल्यास लाल त्रिकोणाचा वापर करावा. औषधे कुलूपबंद पेटीत लहान मुलांपासून लांब ठेवावीत. वापरापूर्वी माहिती पत्रकावरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी, शक्यतो उन्हामध्ये फवारणी टाळावी तसेच हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करणे टाळावे. फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे आणि चेहऱ्यावर मास्कचा वापर करावा. पंपाचे नोझल तोंडाने साफ न करता योग्य नोझल वापरावा. फवारणीच्या ठिकाणी अन्न-पाणी ठेवू नये व फवारणीदरम्यान खाणे, पिणे किंवा तंबाखू, सिगारेटचे सेवन टाळावे. फवारणी संपल्यावर हात, पाय आणि तोंड साबणाने स्वच्छ धुवावे.सर्व काळजी घेऊनही अपघाताने विषबाधा झाल्यास घाबरून न जाता तात्काळ प्रथमोपचार करावेत.
बाधित व्यक्तीला त्वरित अपघात स्थळापासून लांब मोकळ्या हवेत न्यावे आणि अंगावरील औषध लागलेले कपडे बदलावेत. शरीराचा भाग ताबडतोब साबण आणि पाण्याने धुऊन पुसावा. कीटकनाशक पोटात गेले असल्यास ओकारी करण्याचे उपाय करावेत. रुग्णाला दूध, तंबाखू, बिडी किंवा सिगारेट देऊ नये तसेच रुग्ण बेशुद्ध असल्यास काहीही खायला-प्यायला देऊ नये. रुग्णाचा श्वासोच्छ्वास तपासावा आणि श्वास थांबल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करावा. थंडी वाजल्यास पांघरूण द्यावे व घाम आल्यास पुसावा. प्रथमोपचारानंतर रुग्णाला औषधाच्या माहिती पत्रकासह तात्काळ डॉक्टरांकडे नेऊन उपचार सुरू करावेत. शेतकरी बांधवांनी स्वतःची काळजी घेऊन सुरक्षित शेती करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी केले आहे.




Petrol Price




