महत्वाच्या बातम्या

 पर्लकोटा नदी ओसरली! भामरागडचा वाहतूक मार्ग खुला : पण पूरमुक्तीच्या चिंतेचे ढग कायम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड : गेल्या दोन दिवसांपासून पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे खोळंबलेली भामरागडची वाहतूक आज अखेर पूर्ववत झाली आहे. नदीच्या पाणीपातळीत घट झाल्यानंतर आज सकाळी पर्लकोटा पुलावरून पाणी ओसरले असून, भामरागडचा इतर भागांशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला आहे. वाहतूक सुरू झाल्याने नागरिक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून मुख्य रस्त्यांवर पुन्हा एकदा रहदारी सुरू झाली आहे.

सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पर्लकोटा नदीचे पाणी पुलावर आल्याने सलग दुसऱ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला होता. त्यामुळे प्रशासनासह स्थानिक नागरिकांची चिंता कमालीची वाढली होती. आज रस्ता मोकळा झाला असला, तरी पुराच्या आठवणी आणि भविष्यातील भीती अद्याप कायम आहे.

नवीन पुलामुळे मार्ग मोकळा, पण बाजारपेठ सुरक्षित कधी? -
नवीन पुलाच्या बांधकामानंतर वाहतुकीची आणि दळणवळणाची समस्या काही प्रमाणात मार्गी लागेल, असा विश्वास आजच्या वाहतूक पूर्ववत होण्यावरून व्यक्त केला जात आहे. मात्र, नागरिकांचा मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे-रस्ता आणि पूल उंच झाला तरी सखल भागात वसलेली भामरागडची मुख्य बाजारपेठ पुरापासून सुरक्षित कशी राहणार? दरवर्षी पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नद्यांच्या संगम क्षेत्रातील पाण्याचा फुगवटा थेट शहरातील चौक आणि दुकानांपर्यंत पोहोचतो. केवळ वाहतूक सुरळीत होणे ही तात्पुरती सोय असली, तरी भामरागडवासीयांना पावसाळ्यात दरवर्षी घरदार व दुकाने रिकामी करावी लागतात, यावर अजूनही कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

कायमस्वरूपी उपायांची प्रतीक्षा -
आज रहदारी सुरू झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले असले, तरी प्रशासनाने या समस्येकडे केवळ वाहतूक बंद आणि सुरू या दृष्टिकोनातून न पाहता व्यापक पातळीवर पाहावे, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.





  Print






Related Photos