महत्वाच्या बातम्या

 जटपुरा गेट परिसरातील पतंजली स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : सुमारे ४६ हजारांचा औषधसाठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधातील कारवाया अधिक तीव्र केल्या असून बुधवारी जटपुरा गेट परिसरातील पतंजली स्टोअरवर धडक तपासणी करण्यात आली. या कारवाईत सुमारे ४५ हजार ९७० रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी शहरातील एका बेकरीवर कारवाई केल्यानंतर विभागाच्या पथकाने बुधवारी संबंधित स्टोअरची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान काही नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय निर्माण झाल्याने अधिकाऱ्यांनी दुकानातील औषधसाठा ताब्यात घेतला.

जप्त करण्यात आलेल्या औषधांचा प्रकार, त्यांची वैधता तसेच कारवाईमागील नेमकी कारणे याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असून औषधसाठ्याची तपासणी आणि चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विभागाकडून तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या कारवाईमुळे शहरातील औषध विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून नियमांचे पालन करण्याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विविध आस्थापनांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. जटपुरा गेट येथील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात असून चौकशीदरम्यान आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील अंतिम अहवाल आणि विभागाच्या पुढील निर्णयाकडे व्यापारी तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos