भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. डॉ. शशी थरूर यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमला दिली भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सध्या अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाही उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी बृजलाल खाबरी यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली. शशी थरुन सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज गांधी जयंतीदिनी त्यांनी महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामला भेट दिली. यावेळी, सूत कातण्याचं कामही त्यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. डॉ. शशी थरूर यांनी सकाळी ९.१५ वा. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमला भेट दिली. त्यांच्यासोबत आशिष देशमुख होते.आगमन झाल्यानंतर बापू कुटीत मौन प्रार्थना झाली. खा.शशी थरूर यांनी आठ बॉबीनचा अंबर चरखाही यावेळी चालविला. महात्मा गांधींच्या जयंतीदिनाचं औचित्य साधून थरुर यांनी सेवाग्राममध्ये गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केले.
सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुरू असून अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दलित चेहरा म्हणून समोर केले जात असताना शशी थरूर यांनी शनिवारी नागपुरात दीक्षाभूमीला भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी लोकमत भवनला भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी थरूर यांचे स्वागत केले.
निवडणूक पारदर्शी हवी आहे
राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनाही पारदर्शी निवडणूक हवी आहे. ते कुणालाही समर्थन देणार नाहीत हेदेखील स्पष्ट आहे. आपल्याला काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी समर्थन दिले असून देशभरातील प्रतिनिधींकडूनही समर्थन मिळत आहे. पक्षाचे मुख्य निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी सर्वच राज्यांची प्रदेश प्रतिनिधींची यादी दिली आहे. मात्र, बऱ्याच राज्यांच्या यादीमध्ये प्रदेश प्रतिनिधींची पूर्ण नावे नाहीत. काहींचे पत्ते तर काहींचे मोबाइल नंबरही नाहीत. त्यामुळे उरलेल्या १६ दिवसांत सर्वांशी संपर्क साधणे एक मोठे आव्हान आहे. ५० टक्के तिकिटे ही ५० वर्षे वयाखालील व्यक्तींना दिली जावीत, असा ठराव जयपूरच्या शिबिरात घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी व्हावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
News - Wardha