महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर मार्गावरील धोकादायक बॅरिकेट्स काढण्याची मागणी


- मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी नागरिकांचे नगर परिषदेला निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरातील कारगिल चौक ते चंद्रपूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण कामकाज, बंद असलेल्या स्ट्रीट लाईट्स व मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मार्गावरील डिव्हायडरवर बसविण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स तात्काळ काढण्यात यावेत तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कारगिल चौक ते चंद्रपूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील पाच ते सहा वर्षांपासून संथ गतीने सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण व नियोजनशून्य कामकाजामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ ते १० वाजताच्या सुमारास कारगिल चौक परिसरात दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात गडचिरोली नगर परिषदेचे आरोग्य व स्वच्छता सभापती मुक्तेश्वर काटवे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीसमोर अचानक डुक्कर आल्याने अपघात घडला. परिसरातील अनेक स्ट्रीट लाईट्स बंद असल्याने त्यांना प्राणी दिसला नाही. धडकेत डुक्कर जागीच ठार झाला तर काटवे हे रस्त्यावर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सध्या या मार्गावरील डिव्हायडरवर लोखंडी बॅरिकेट्स बसविण्याचे काम सुरू असून ते नियोजनशून्य पद्धतीने बसविण्यात आल्याने वाहनचालकांना स्पष्ट दृश्यता मिळत नाही. विशेषतः यु-टर्नच्या ठिकाणी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत –

चंद्रपूर मार्गावरील डिव्हायडरवरील लोखंडी बॅरिकेट्स तात्काळ काढावेत.
महामार्गावरील सर्व बंद स्ट्रीट लाईट्स तातडीने सुरू कराव्यात.
शहरातील मोकाट जनावरे व डुक्कर यांचा बंदोबस्त करावा.
संबंधित कामाची तांत्रिक तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी.

या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास स्थानिक नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास भाग पडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

कारगील चौक चे सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांच्या नेतृत्वात नगर परिषदेला हे निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. कविता मोहरकर, सुचिता धकाते, निलीमा देशमुख, विद्या कुमरे, स्मिता दुधे, संगीता यंगंधलवार, मनीषा धकाते, सुरेखा पाटील, हिरा वासनिक आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos