महत्वाच्या बातम्या

 मुंबई विद्यापीठात मिळणार दुहेरी पदवीचे शिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. याअनुषंगाने आता मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचे शिक्षण मिळणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी) विभागाने फ्रांसमधील प्रतिष्ठित ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे.

अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी फेलोशिपवर ट्रॉयस विद्यापीठात शिकता येणार असून त्या विद्यापीठातील तज्ज्ञांसोबत काम करण्याची मोठी संधी मिळेल. दुहेरी पदवी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या या दुहेरी पदवीमुळे प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृध्दीस हातभार लागणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी) विभाग आणि ट्रॉयस विद्यापीठ फ्रान्स या दोन्ही उच्च शिक्षण संस्थामध्ये झालेल्या कराराअंतर्गत विद्यार्थी विनिमयामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वातावरणात अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संशोधन पद्धती आणि उपकरणांचा अभ्यास करता येईल तर, प्राध्यापक विनिमयाअंतर्गत संशोधकांना संयुक्त आणि सहयोगी प्रकल्पांवर एकत्रित काम करण्याची संधी मिळणार आहे.

संशोधन सहयोगाअंतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापरामुळे संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकतील. त्याचबरोबर या सहयोगी कार्यक्रमामुळे संशोधन प्रकाशने आणि संयुक्त प्रकाशनावरही काम करण्याची संधी मिळू शकणार असल्याचे अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. तसेच या पदव्युत्तर एम.एस्सी दुहेरी पदवी अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवून पीएच.डी.साठीही सामायिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या करारामुळे उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने वाटचाल करताना अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आणि युरोपियन देशातील संशोधनाच्या प्राधान्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील जागतिक समज विस्तृत करण्यास मदत होईल. तसेच जागतिक स्तरावरील प्रख्यात संस्थांमध्ये डॉक्टरेट आणि पोस्टडॉक्टरल संशोधनासारख्या प्रगत अभ्यास करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संधीचे दालन खुले होईल.

दुहेरी पदवीचे फायदे :  

- विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळवण्याची संधी

- मुंबई विद्यापीठ आणि ट्रॉयस विद्यापीठाकडून मिळणाऱ्या दुहेरी पदवीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची आंतरराष्ट्रीय ओळख वाढविण्यास मदत

- विद्यार्थ्यांना भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांतील वैविध्यपूर्ण शैक्षणिक वातावरण, अध्यापन पद्धती आणि संशोधन पद्धतींचा फायदा

- दोन वेगवेगळ्या देशांमध्ये राहणे आणि अभ्यास करण्यामुळे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक जागरूकता, अनुकूलता आणि भाषा कौशल्ये विकसित करण्यास मदत

- सांस्कृतिक आणि भाषा कौशल्ये वृद्धीस मदत

- दोन्ही संस्थांमधील अत्याधुनिक संशोधन सुविधा आणि प्रयोगशाळांच्या प्रवेशामुळे व्यावहारिक कौशल्ये आणि संशोधन क्षमता वाढीस चालना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दुहेरी पदवी कार्यक्रमामुळे मुंबई विद्यापीठाने अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दृष्टिकोन विस्तारण्यासाठी टाकलेले हे महत्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशातील अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील अध्ययन, अध्यापन पद्धती, संशोधन आणि कौशल्य वृद्धीस चालना देण्यासाठी व विद्यार्थ्‍यांमध्‍ये आंतर-सांस्‍कृतिक समज आणि जागतिक दृष्टीकोनांना प्रोत्साहन देण्यासाठी या कराराचे महत्व अधोरेखित होणार असल्याचे ते म्हणाले.

  Print


News - Rajy
Related Photos