जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध वयोगटांत अव्वल यश संपादन केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चपळाई, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता, शिस्त आणि उत्कृष्ट तंत्रकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. नियमित सराव व मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांत उल्लेखनीय कामगिरी केली.
१४ वर्षांखालील (U-14) वयोगटात
विद्यालयाचे योग मसरम आणि पिंटू मंडळ यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळविले.
१७ वर्षांखालील (U-17) वयोगटात
पियुष गारघाटे, अंगत जवादे आणि प्रज्वल तुलावी यांनी दमदार कामगिरी करत यश संपादन केले.
१९ वर्षांखालील (U-19) वयोगटात
राम लाटकर आणि मंथन उसेंडी यांनी आपल्या खेळातील कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत अव्वल कामगिरी नोंदविली.
या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक योगेश चौव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियमित सराव, तंत्रकौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्तीवर विशेष भर देत स्पर्धेसाठी तयारी केली. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे तसेच पर्यवेक्षक अजय वानखेडे, शिक्षकवृंद आणि क्रीडा विभागाच्या वतीने यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे आणि गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा प्राचार्यांनी दिल्या.




Petrol Price




