राज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना देणार लस, जाणून घ्या गोवर - रुबेलाबाबत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज २७ नोव्हेंबर पासून गोवर - रुबेला लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून राज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. गोवर - रुबेला आजार काय आहे आणि संक्रमण कसे होते, लस घेणे का आवश्यक आहे याबाबत जाणून घ्या. 
गोवर हा संक्रमक व घातक आजार असून त्यामुळे २०१६ मध्ये देशात ५० हजार मुलांचा मृत्यू झाला होता. तर रूबेला सौम्य संक्रमक आजार असला असून तो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना देखील होतो. गर्भवती स्त्रियांना हा आजार झाला तर अचानक गर्भपात अथवा बाळांना जन्मजात शाररिक दोष निर्माण होवून शकतो. त्यामुळे भारत सरकारने गोवर आजाराचे निमुर्लन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे.  
गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी व चार ते सहा दिवस नंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवरचा खोकला जाण्यास दोन आठवडे लागतात. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव असतो. काही बालकांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेमुळे अंधत्व येते. गोवरमुळे होणारा न्यूमोनिया हा बऱ्याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो. गोवर हा विषाणूजन्य आजार असल्याने विशिष्ट असे औषध त्यावर नाही. लक्षणांनुसार त्यावर उपचार केले जातात. बाळाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखणे. ज्यांना श्वसनाला त्रास होत आहे, त्यांना ऑक्सिजन किंवा कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवणे असे उपाय करावे लागतात. रुबेला हाही विषाणूजन्य आजार आहे. या आजाराची लक्षणे ही गोवरसारखीच असतात; परंतु गोवरप्रमाणे तीव्र नसतात.
मात्र या दोन्ही आजारांसाठी वेळीच लसीकरण करणे आवश्यक असून त्याकडे पालकांनी अजिबात दुर्लक्ष करु नये. नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना ही लस यापूर्वी जरी देण्यात आली असेल तरी अतिरिक्त संरक्षण म्हणून पुन्हा लस देणे आवश्यक आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-11-27


Related Photos