शिवसेनेच्या महिला नेत्याविरोधात घुग्घुस येथे खंडणीचा गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपुरातील एका कोळसा व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका उज्ज्वला नलगे आणि त्यांचा भाचा सुप्रित रासेकर या दोघांविरुद्ध घुग्घुस पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यापारी आणि नलगे यांच्यातील संभाषणाची ध्वनिफीत पोलिसांकडे उपलब्ध आहे.
तक्रारकर्ते अमित अनेजा यांचा नागाळा येथे कोल डेपा आहे. तो अकृषक भूखंडावर आहे. बुधवार, १२ ऑक्टोंबर रोजी उज्ज्वला नलगे यांचा भाचा सुप्रित रासेकर दोन चारचाकी वाहनातून सहकाऱ्यांसह या कोल डेपोवर आला. मी नलगे यांचा स्वीय सहाय्यक आहे, अशी ओळख त्याने सांगितली. तिथून त्याने अनेजा यांच्याशी संपर्क साधला. कोल डेपोच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे हा डेपो बंद करण्यासाठी आलो आहे, असे त्याने धमकावले. त्यावेळी नलगे घटनास्थळी आल्या नव्हत्या.
मात्र त्यांनी अनेजा यांच्याशी संपर्क साधला. सायंकाळी सहा वाजता नलगे यांच्या घुग्घुस येथील निवासस्थानी बैठक ठरली. अनेजा त्यांच्या निवासस्थानी पोहचले. तिथे नलगे आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना धमकावले. तुमच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे आम्ही कोल डेपो बंद पाडणार, अशी धमकी दिली. डेपो सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागितली, असा आरोप अनेजा यांनी ऑनलाईन तक्रारीत केला आहे.
तिथून बाहेर पडल्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा नलगे यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला.
कार्यकर्ते कोल डेपो येथे धरणे आंदोलनासाठी जात आहे, असे सांगितले. त्यावेळी अनेजा यांनी घुग्घुसचे ठाणेदार आमटे व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात नलगे खंडणी मागत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ठाणेदार आमटे यांचेशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.
शिवसेना नेत्या नलगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी मुलगा रोहन यांनी उचलला. श्रीमती नलगे या चंद्रपूरमधील मानवटकर रुग्णालयात दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या झोपलेल्या असल्याने बोलता येणार नाही, असेही सांगितले.
News - Chandrapur