कौशल्यविकासातून विकास साधा आमदार सुधाकर अडबाले यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
श्रीसाई आयटीआय चंद्रपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : देशातील कोट्यवधी युवकांना दरवर्षी नवीन नोकरीची स्वप्ने दाखविण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर केंद्रातील सरकारने नवीन नोकरी देण्याऐवजी नोकरभरतीच बंद केली. त्यामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाच्या प्रत्येक विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे युवकांनी खचून न जाता रोजगाराच्या नव्या संधी शोधाव्या. कौशल्यविकासातून विकास साधावा, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
येथील श्रीसाई आयटीआय येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभास ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी स्व. एम. डी. येरगुडे मेमोरिअल शिक्षक प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती विद्याताई येरगुडे होत्या. अतिथी म्हणून सचिव श्री. अमित येरगुडे, कौशल्यविकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त श्री. भैयाजी येरणे, श्री. अजय जी, श्रीहरी शेंडे, प्राचार्य श्री. राजेश पेशट्टीवार आदींची मंचावर उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार सुधाकर अडबाले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती विद्याताई येरगुडे, भैयाजी येरणे यांचाही सत्कार करण्यात आला.
आमदार अडबाले पुढे म्हणाले, आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी छोटे-छोटे लघु उद्योग उभारावे. उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनांचा लाभ घ्यावा. यावेळी श्री. येरणे, श्री. अजय जी यांनीही विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य राजेश पेशट्टीवार यांनी केले. संचालन वर्षा गावंडे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
News - Chandrapur