पहिली स्लीपर वंदे भारत हाऊसफुल्ल, प्रवाशांचा तुफान प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत १७ जानेवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस चे लोकार्पण करण्यात आले.
हावडा–कामाख्या या महत्त्वाच्या मार्गावर धावणारी ही अत्याधुनिक ट्रेन सुरू होताच प्रवाशांकडून तिला मोठा प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच फेरीपासून तिकीट बुकिंग वेटिंग लिस्टवर गेले आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेन २२ जानेवारी २०२६ रोजी कामाख्या येथून आणि २३ जानेवारी २०२६ रोजी हावडा येथून नियमित सेवेत दाखल होणार आहे. लोकार्पणानंतर अवघ्या २४ तासांच्या आत सर्व श्रेणीतील तिकिटे हाऊसफुल्ल झाल्याने या ट्रेनबाबत प्रवाशांमध्ये असलेला उत्साह स्पष्टपणे दिसून आला आहे. ऑनलाइन बुकिंग सुरू होताच काही तासांतच सर्व जागा भरल्या, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
स्लीपर वंदे भारत ट्रेन कामाख्या येथून सायंकाळी ६.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता हावडा जंक्शन येथे पोहोचते. ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावणार आहे. ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन असून, ती १८० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे.
या ट्रेनमध्ये एकूण १६ कोच असून, त्यात ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि १ फर्स्ट एसी कोचचा समावेश आहे. एकूण ८२३ प्रवासी क्षमतेच्या या ट्रेनमध्ये थर्ड एसीसाठी ६११ बर्थ, सेकंड एसीसाठी १८८ बर्थ**, तर फर्स्ट एसीसाठी २४ बर्थ उपलब्ध आहेत.
तिकीट दराबाबत, थर्ड एसीचे दर (जेवणासह) सुमारे ₹ २ हजार ३००, सेकंड एसीसाठी ₹३ हजार तर फर्स्ट एसीसाठी ₹३ हजार ६०० इतके निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यान, स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी काही नवे नियम लागू करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास तिकीट रद्दीकरणावर पैसे परत मिळणार नाहीत, असा इशाराही रेल्वेने दिला आहे. तसेच पहिल्याच प्रवासात काही प्रवाशांनी सीटवर कचरा टाकल्याच्या घटना समोर आल्याने, स्वच्छतेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची चिंता खरी ठरल्याचे दिसून आले आहे.
भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार, पुढील सहा महिन्यांत आणखी ८ स्लीपर वंदे भारत ट्रेन, तर एका वर्षात एकूण १२ ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. भविष्यात २०० हून अधिक स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा व्यापक रोडमॅपही रेल्वेने तयार केला आहे.
एकूणच, वेग, सुविधा आणि आरामदायी रात्रप्रवास यांचा संगम असलेली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस उतरली असून, भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेच्या प्रवासात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे.
News - World




Petrol Price




