देशाला कर्जबाजारी व महागाई च्या खड्ड्यात लोटण्याचे महापाप भाजप सरकारचे : विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार


- सिंदेवाहीतील जनआक्रोश महामोर्चात विजय वडेट्टीवार यांचा घणाघात
- हजारोंच्या जनसागराने सरकारविरोधात हल्लाबोल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या जनविरोधी, शेतकरीविरोधी आणि युवकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे सोमवार २४ आगस्ट रोजी सिंदेवाही येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. सिंदेवाहीतील शिवाजी चौक येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले.
मोर्चाला संबोधित करताना आ .विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप सरकारने सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी नव्हे, तर मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी केला आहे. देशाची संपत्ती विकण्याचे, सार्वजनिक उद्योग कमकुवत करण्याचे आणि सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम या सरकारने केले आहे. संपूर्ण देशाला लुटून देश गहाण ठेवण्याचे महापाप भाजप सरकारने केले आहे, असा घणाघात त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे, बेरोजगारीमुळे युवकांचे भविष्य अंधारात गेले आहे, तर शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न अधिक गंभीर बनले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील प्रत्येक घटक त्रस्त झाला आहे. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोठमोठी आश्वासने देण्यात आली, मात्र सत्तेत आल्यानंतर सुमारे एक कोटी महिलांना योजनेतून वगळण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही, कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली असून त्याचा शेतकऱ्यांना कोणताही लाभ झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक कामात भ्रष्टाचार वाढला असून ४० टक्के कमिशनशिवाय काम होत नाही, असा आरोप करत त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे तसेच इतर योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळत नसून कार्यालयाची पायपीट करावी लागत असल्याची वास्तव स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्जमाफीचा सरसकट लाभ दिला नसल्याने , शेतकरी हवालदिल झाले असून अनेक जाचक अटी घातल्याने तसेच कंपन्यांच्या नावावर शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा डाव सरकारकडून होत असल्यामुळे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान सरकार करत आहे.पण आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी लढू असे वडेट्टीवार म्हणाले.
राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी हजारो शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचे सांगितले. एकीकडे महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन देत असताना दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.देशभरातील युवकांनी सरकारविरोधातील संताप जंतर-मंतरवर व्यक्त केला असताना त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत, या जनविरोधी सरकारला आता जनता धडा शिकवेल, असा इशाराही काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
मोर्चाच्या समारोपानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. वाढती महागाई आटोक्यात आणणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना हमीभाव व न्याय देणे, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे तसेच सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी करणे, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
या जनआक्रोश महामोर्चामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सरकारच्या धोरणांविरोधातील जनतेचा रोष मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला. यावेळी सिंदेवाही तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस महिला काँग्रेस युवक काँग्रेस, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत पदाधिकारी, ग्राम काँग्रेस कमिटी, सरपंच संघटना पदाधिकारी, व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




