महत्वाच्या बातम्या

 ९४ हजारावर विद्यार्थ्याची देणार संकलित मूल्यमापन चाचणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अमरावती : इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्याची संकलित मूल्यमापन चाचणी-२ चे आयोजन ४ ते ६ एप्रिल दरम्यान केले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून संकलित मूल्यमापन चाचणी-२ तसेच पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन केले जाते.

संकलित मूल्यमापन चाचणींतर्गत जिल्ह्यातील शासकीय, खासगी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २ हजार ५१७ शाळांमधील तिसरी ते आठवीच्या सुमारे ९४ हजार ७३९ विद्यार्थ्याची चाचणी घेतली जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्याची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे.

शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणामांचे बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच खासगी अनुदानित जिल्ह्यातील २ हजार ७३९ शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या ९४ हजार ७३९ विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती निश्चितीसाठी ४ एप्रिलपासून संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट) घेतली जाणार आहे. या मुल्यमापन चाचणीतून गुरूजींनी नेमके किती व कसे अध्यापन केले, मुले किती शिकली, त्यांना किती समजले हे कळणार आहे.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. याकरीता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेकडूृन चाचणी दरम्यान भेटीसाठी नियोजन केले आहे. यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख आदी संकलीत मूल्यमापन चाचणी दरम्यान भेटी देणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने यांनी सांगितले.

असे आहे संकलित मूल्यमापन चाचणी २ चे वेळापत्रक -

प्रथम भाषा (सर्व माध्यम)-४ एप्रिल- तिसरी व चौथी (सकाळी ८ ते ९.३०)
गणित- (सर्व माध्यम) ५ एप्रिल-पाचवी आणि सहावी (सकाळी ८ ते ९.४५)
इंग्रजी -६ एप्रिल-सातवी आणि आठवी (सकाळी ८ ते १०

तालुकानिहाय तिसरी ते आठवीची विद्यार्थी संख्या -

अमरावती ४ हजार ५८४, अचलपूर ५ हजार ४६८, अंजनगाव सुजी २ हजार ५५५, भातकुली ३ हजार ८०८, चांदूर बाजार ४ हजार ९९, चांदूर रेल्वे ३ हजार ८३५, चिखलदरा १० हजार १४७, दर्यापूर १२ हजार ३१७, धामनगांव रेल्वे ३ हजार ४८०, धारणी १५ हजार ६८, मोर्शी ५ हजार ८६, तिवसा ३ हजार २०४, वरूड ६ हजार ४४,महापालिका १० हजार २३० एकूण ९४ हजार ७३१ विद्यार्थी ही चाचणी देणार आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos