कापूस खरेदी केंद्रांचे कार्य व शेतकऱ्यांच्या समस्या : ३ लाख शेतकऱ्यांची नोंदणी, मात्र फक्त २७ लाख क्विंटल कापूस खरेदी


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भात ४०० कापूस खरेदी केंद्रे कार्यरत असून, १८ डिसेंबरपर्यंत तीन लाख ३४ हजार ७६९ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. मात्र, त्यांच्याकडून केवळ २७ लाख ५ हजार ६३७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आले. भारतीय कापूस महामंडळाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून याबाबत माहिती दिली आहे.
महामंडळाने सांगितले की, ४०० पैकी ३४६ कापूस खरेदी केंद्रे जिनिंग अॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना केंद्रांची माहिती देण्यासाठी विविध माध्यमांतून जाहिराती करण्यात आल्या आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा सचिव श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर आणि रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने महामंडळाचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेतले आणि त्यातील माहितीची सत्यता तपासण्यासाठी न्यायालय मित्र अॅड. पुरुषोत्तम पाटील व सातपुते यांना निर्देश दिले.
महामंडळाला प्रामाणिकपणे विचार करण्याचे निर्देश -
न्यायालयाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रामाणिकपणे विचार करण्याचे भारतीय कापूस महामंडळाला निर्देश दिले. यासंदर्भात पुढील सुनावणी १६ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.
News - Nagpur




Petrol Price




