महत्वाच्या बातम्या

 राज्यात येत्या ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड होण्याकरिता विविध विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावेत, असे आवाहन करतांनाच पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बांबू लागवड उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित पहिल्या बांबू टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव, अनुपकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, रोहयो विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जगभरात प्रदूषणाची समस्या वाढत आहे, वातावरण बदलामुळे पुढील पिढ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. पर्यावरण रक्षण आणि ऊर्जा संकटाचा मुकाबला करण्यासाठी बांबू लागवड हा महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. तसेच बांबूची वाढत्या मागणी लक्षात शेतकऱ्यांनी बांबू लागवड केल्यास त्यांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी बांबू क्लस्टर निर्माण करण्याचे आवाहन आपण केले आहे.

त्याप्रमाणे शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे आपले धोरण आहे. हे धोरण यशस्वी करण्यासाठी राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी, वन, सामाजिक वनीकरण, पर्यावरण यासह सर्व विभागांनी सकारात्मक भावनेतून टीम म्हणून काम करावे. तसेच यासाठी आवश्यक निधी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार हमी योजना विभागाकडून उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीच्या सुरुवातीला बांबू लागवडीविषयी सादरीकरण करतांना पटेल यांनी सांगितले की, राज्यात येत्या ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून काम सुरु असल्याचे सांगितले.

मंत्रालयात १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बांबू विकास नियामक मंडळाची बैठक झाली. त्यात बांबू रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी बांबू ऊतीसंवर्धन रोपवाटिका तयार करावी. बांबू पॅलेट आणि बांबू चारकोलसाठी आयआयटी, मुंबईच्या सहकार्याने प्रकल्प अहवाल तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी, याबाबतही मंत्री मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेताना बॅकांकडून अडवणूक होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यात अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करुन बांबू हे उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असल्याचे दाखवून दिले आहे. या शेतकऱ्यांच्या प्रकल्पांना इतर शेतकऱ्यांच्या भेटी आयोजित करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.





  Print






News - Rajy




Related Photos