बिबट्या झाडावर अन् खाली गावकऱ्यांचा गराडा : वाघभूमीत तासभर थरार


- गावालगत बिबट्याचा शिरकाव; बिजाच्या झाडावर घेतला आश्रय, वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप जंगलाच्या दिशेने हुसकावले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खामतळा ग्रामपंचायतीच्या वाघभूमी टोली येथे रविवारी ६ सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास बिबट्याने थेट गावालगत प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावालगत बिबट्याचे दर्शन होताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने लगतच्या बिजाच्या झाडावर चढून आश्रय घेतला. त्यामुळे झाडावर बिबट्या आणि खाली नागरिकांचा गराडा, असा सुमारे तासभर थरारक प्रसंग निर्माण झाला.
रविवारी सायंकाळी बिबट्या वाघभूमी टोलीच्या गावालगत आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. बिबट्याच्या आगमनाची माहिती परिसरात वेगाने पसरताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थ घटनास्थळी जमा होऊ लागले. नागरिकांची वाढती गर्दी आणि हालचाल पाहून बिबट्याने सुरक्षित आसरा शोधत जवळच असलेल्या बिजाच्या झाडावर चढून घेतला.
झाडावर बिबट्या, खाली नागरिकांचा गराडा -
बिबट्या झाडावर चढून बसल्याने घटनास्थळी मोठा थरार निर्माण झाला. झाडाखाली नागरिकांची गर्दी वाढत होती, तर बिबट्या झाडावर बसून खालील हालचालींवर लक्ष ठेवून होता. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता वाढत असली तरी गर्दीमुळे परिस्थिती धोकादायक बनण्याची शक्यता होती.
दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी सुमारे अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने नागरिकांना झाडापासून दूर हटवून परिसर मोकळा केला. गर्दी नियंत्रणात आणल्यानंतर बिबट्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली.
तासाभरानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने -
सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बिबट्या बिजाच्या झाडावरून खाली उतरला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेल्यानंतर घटनास्थळी निर्माण झालेला तणाव कमी झाला.
गावात भीतीचे सावट -
गावालगतच बिबट्या झाडावर चढून बसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने वाघभूमी टोलीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. विशेषत रात्रीच्या वेळी बिबट्या पुन्हा गावाच्या दिशेने येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे.
वाघभूमी टोली परिसर जंगलालगत असल्याने वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी गावाबाहेर किंवा जंगलालगतच्या परिसरात फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याचा पुन्हा गावात शिरकाव होऊ नये, यासाठी वन विभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
नागरिकांची वनकर्मचाऱ्यांशी बाचाबाची -
दरम्यान, बिबट्या गावालगत आल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, बिबट्याचा बंदोबस्त करण्याऐवजी त्याला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यात आल्याने काही नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त केला.
बिबट्याने एखाद्या नागरिकावर हल्ला केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. बिबट्या पुन्हा गावात येण्याची शक्यता लक्षात घेता वन विभागाने रात्रीच्या वेळी विशेष गस्त घालावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
परिसरात पेट्रोलिंग सुरू -
घटनेची गांभीर्याने दखल घेत मालेवाडा वन विभागाने परिसरात पेट्रोलिंग सुरू केले आहे. मालेवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश भडांगे यांनी या भागात गस्त सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी परिसरात पाहणी व गस्त घालत आहेत.दरम्यान, नागरिकांनी बिबट्याचा पुन्हा वावर आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, तसेच तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




Petrol Price




