पोर्ला येथे विद्यार्थ्यांचे चक्काजाम आंदोलन : एसटी प्रशासनाकडून लेखी आश्वासन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : बपोर्ला येथे जलद (एक्स्प्रेस) बसेस थांबविण्यात याव्यात तसेच शालेय वेळेत जादा बसेस सोडाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी आरमोरी–गडचिरोली मार्गावर आक्रमक पवित्रा घेत चक्काजाम आंदोलन केले. सकाळी ९.३० ते ११.३० या दोन तासांच्या कालावधीत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पोर्ला हे परिसरातील मोठे गाव असून येथून शेकडो विद्यार्थी दररोज आरमोरी येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र बसअभावी विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीस सामोरे जावे लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्याने विद्यार्थी व पालकांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यानंतर एसटी महामंडळाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. चर्चेनंतर एसटी प्रशासनाने सकाळी ७ वाजता आणि ९.३० वाजता आरमोरी व गडचिरोलीकडे जाण्यासाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येतील तसेच प्रत्येक बस पोर्ला येथे थांबविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर सकाळी ११.३० च्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.
आमदारही उतरले रस्त्यावर -
या आंदोलनात आमदार रामदास मसराम, पोर्लाच्या सरपंच निवृत्ता राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सेलोटे यांच्यासह विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शैक्षणिक नुकसानीचा प्रश्न गंभीर असल्याने आमदारांनी तातडीने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जाब विचारला.
News - Gadchiroli




Petrol Price




