वाघांच्या जंगलात मुलांच्या हास्याला मिळणार सुरक्षित अंगण : ताडोबाच्या बफर गावांत तारू उद्यान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : एका बाजूला ताडोबाच्या जंगलात मुक्तपणे वावरणारे वाघ, बिबट्या, अस्वल आणि गौर... तर दुसऱ्या बाजूला याच जंगलाच्या कुशीत राहणारी गावे. वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मुलांना मोकळ्या जागेत खेळण्यासाठी पाठविताना पालकांच्या मनात धाक निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही निवांत बसण्यासाठी सुरक्षित जागांचा अभाव जाणवतो. अशा परिस्थितीत माणूस आणि जंगल यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने तारू उद्यान या अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात शंभरहून अधिक गावे आहेत. या गावांतील नागरिक आणि वन्यजीव एकाच भूप्रदेशाचे सहअस्तित्व स्वीकारून जगत आहेत. वाघ, बिबट्या, अस्वल, गौर यांसह वन्यजीवांची संख्या वाढत असताना त्यांचा गावालगतच्या भागातील वावरही वाढला आहे. त्यामुळे मुलांचे मोकळ्या मैदानातील खेळ, धावणे, मित्रांसोबत वेळ घालवणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात वाढणे यावर मर्यादा येत आहेत.
मुलांच्या सुरक्षिततेची चिंता आणि ज्येष्ठांच्या विरंगुळ्याची गरज लक्षात घेऊन ताडोबाने सुरक्षित आणि कुंपणयुक्त सामुदायिक जागा उभारण्याची संकल्पना पुढे आणली आहे. भामडेली आणि हळदी या बफर गावांमध्ये ‘तारू उद्यान’ उभारण्यात आले असून, आणखी काही गावांमध्ये उद्यानांची निर्मिती सुरू आहे. बफर क्षेत्रातील सर्व गावांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
तारू उद्यान केवळ खेळण्याची किंवा फिरण्याची जागा राहणार नसून, ती निसर्गाशी नाते जोडणारी छोटीशी शाळाच ठरणार आहे. चेन-लिंक कुंपण, प्रवेशद्वार, मुलांसाठी खेळाची साधने, चालण्यासाठी पायवाटा, बाके, सौर दिवे, स्थानिक वृक्ष-झुडपांचे सुशोभीकरण, कचरापेट्या आणि पर्यावरणविषयक माहिती फलक अशा सुविधांनी ही उद्याने सजविली जात आहेत. या उद्यानांच्या माध्यमातून मुलांना निसर्गापासून दूर ठेवण्याऐवजी निसर्ग समजून घेण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक सहभागी गावात ‘फ्रेंड्स ऑफ तारू’ बाल क्लब स्थापन करण्यात येणार असून, स्थानिक शालेय विद्यार्थी त्याचे सदस्य असतील. झाडांना पाणी देणे, वनस्पतींचे संरक्षण, उद्यानाची देखभाल, स्वच्छता मोहिमा, पक्षीनिरीक्षण आणि निसर्गभ्रमंती अशा उपक्रमांमध्ये मुलांचा सहभाग राहणार आहे.
जागतिक पर्यावरण दिन, वन्यजीव सप्ताह आणि वसुंधरा दिन यांसारखे दिवसही या बाल क्लबच्या माध्यमातून साजरे केले जातील. आपल्या गावातील जंगल, वन्यजीव आणि जैवविविधतेचे महत्त्व समजून घेणारी ही मुले भविष्यात संवर्धनाचे युवा दूत म्हणून काम करतील. या उपक्रमाच्या नावातही ताडोबाच्या परंपरेची भावनिक नाळ जोडलेली आहे. जंगलांचे पौराणिक संरक्षक मानल्या जाणाऱ्या तारू देव यांच्या नावावरून ‘तारू उद्यान’ हे नाव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या उद्यानातून केवळ आधुनिक सुविधा निर्माण होत नसून, ताडोबाच्या सांस्कृतिक वारशाची आठवणही जपली जात आहे.
ग्रामपंचायत आणि ग्राम पर्यावरण विकास समितीच्या सल्लामसलतीने सामुदायिक जमिनीवर ही उद्याने विकसित केली जात आहेत. त्यांच्या देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायत, ग्राम पर्यावरण विकास समिती आणि ‘फ्रेंड्स ऑफ तारू’ बाल गटाच्या सहभागातून पार पाडली जाणार असून, ताडोबाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून नियमित देखरेख केली जाणार आहे. सामुदायिक वृक्षारोपण आणि विविध विभागांच्या समन्वयातून वार्षिक देखभालीलाही चालना दिली जाणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांनी सांगितले की, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासोबतच समुदाय आणि वन प्रशासनातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने ‘तारू उद्यान’ हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जागरूक आणि सक्रिय स्थानिक समुदायांच्या सहकार्याने ताडोबाची जंगले आणि वन्यजीवांचे भविष्य सुरक्षित करण्यास या उपक्रमाची मदत होईल.
ताडोबाच्या जंगलातील वन्यजीवांचे अस्तित्व जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या जंगलाच्या सावलीत जगणाऱ्या माणसांचे सुरक्षित आणि आनंदी जीवनही महत्त्वाचे आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य, ज्येष्ठांच्या गप्पा आणि जंगलाविषयीची आपुलकी यांना एकाच जागी आणण्याचा प्रयत्न ‘तारू उद्यान’च्या माध्यमातून होत आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाऐवजी सहअस्तित्वाची नवी वाट या उपक्रमातून तयार होण्याची अपेक्षा आहे.




Petrol Price




