'तुला पाहते रे' मालिका घातक, प्रक्षेपण बंद करण्याची मागणी


वृत्तसंस्था / पुणे :  'तुला पाहते रे' या मराठी मालिकेची प्रेक्षकांमध्ये सध्या बरीच चर्चा आहे. ईशा निमकर आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमकथेवरून सध्या प्रेक्षकांमध्येही मतभेद असल्याचं समोर येत आहे. कॉलेजमध्ये जाणारी २० वर्षाची तरुणी आणि ४० वर्षाचा उद्योगपती यांच्यातली ही लव्हस्टोरी समाजातील नवीन पिढीसाठी घातक असून ही मालिका बंद करण्यात यावी अशी मागणी करणयात आली आहे. 
सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना या मालिकेचे प्रक्षेपण बंद करण्यासंदर्भात निवेदन दिलं आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश दिला जात नाहीए, उलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा ध्यास आहे. २० वर्षाची मुलगी ४० वर्षाच्या पुरुषाच्या प्रेमात पडते. हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्राला घातक आहे. मालिकेतून माता- भगिनींना एक वेगळाच संदेश देण्याचा घात निर्मात्यांनी घातला आहे, असं नाईक यांनी निवेदनात लिहीलं आहे.  मालिकेत बदल करावा किंवा मालिकेचं प्रक्षेपण बंद करण्यात यावं अशी मागणी देखील नाईक यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर देखील या मालिकेच्या विरोधात चर्चा सुरू होत्या. असं असलं तरी टीआरपीच्या स्पर्धेत मात्र मालिकेनं आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-11-27


Related Photos