अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने मांडाव्या प्राध्यापकांच्या समस्या


-  महाराष्ट्र शासनाचा निर्णय 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगा सोबत इतर अनेक  मागण्या सादर केल्या होत्या. ७ मार्च व १७ जून २०१९ अश्या दोन बैठकामध्ये अ.भा.रा.शै. महासंघाने या संदर्भात विविध मागण्या रेटल्या होत्या. अ.भा.रा.शै. महासंघ संलग्नित गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच गडचिरोलीद्वारा  प्राध्यापकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात  विस्तृत निवेदन दोनही बैठकांमध्ये सादर करण्यात आले होते.  ८ मार्च २०१९ चा सातव्या वेतन आयोगासंबंधित शासन निर्णय तसेच १० मे रोजी प्रसारित शुद्धीपत्रकावर अभ्यास गटाची स्थापना करून गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच गडचिरोलीने सर्वसमावेशक असा मसुदा सादर केला होता.  ना.  तावडे यांनी या बैठकीत प्राध्यापकांच्या अनेक प्रलंबित मागण्या आणि सातव्या वेतन आयोगातील त्रुटी निवारण करण्यासाठी एक समिती स्थापन करून समितीने सर्व मागण्यांचा विचार करून शासनास शिफारस करावी असे सुचित केले होते. त्यानुसार नुकताच   १४ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय  जाहीर करून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत विशेष समिती स्थापन केली. या शासन निर्णयानुसार शैक्षिक महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ अनिल कुलकर्णी, सरचिटणीस डॉ शेखर चंद्रात्रे आणि सदस्य  डॉ कल्पना पांडे यांना संघटनेतर्फे योग्य समर्थनासह विस्तृत मागण्या समितीसमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच गडचिरोली तर्फे पुढाकार घेऊन या समितीकडे प्राध्यापकांच्या सर्व मागण्या जोरकसपणे मांडून अनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नांना तसेच सातव्या वेतन आयोगातील त्रुटींना वाचा फोडण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्याचा मानस   गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच गडचिरोलीचे अध्यक्ष डॉ.पी.अरूणाप्रकाश  यांनी व्यक्त केला.
प्राध्यापकांच्या मागण्यांना संवैधानिक रीतीने सरकार दरबारी पोहोचवण्याची ही संधी अनेक समस्यांची कोंडी फोडणारी आहे. या माध्यमातून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ प्राध्यापकांच्या सर्व समस्या सोडविणार यात शंकाच नाही. याबद्दल महाराष्ट्र राज्य शैक्षिक महासंघाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीशी संलग्नित जास्तीत जास्त महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अपल्या समस्या सकारात्मक पध्दतीने शासनस्तरावर पोहचविण्यासाठी त्या गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचाकडे पठवाव्यात असे आवाहन संघटनेचे सचिव डॉ. रूपेन्द्रकुमार गौर करीत आहेत.  यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  यांनी प्राध्यापकांच्या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घातल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-17


Related Photos